पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) शिवाजीनगर ते लोणीकाळभोर या दरम्यानचा मेट्रो प्रकल्प खासगी भागीदारी तत्वावर (पीपीपी) राबविणे शक्य आहे का, याबाबतचा व्यवहार्यता तपासणी अहवाल (प्री फिजिबिलीटी रिपोर्ट) तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या अहवालानंतर शिवाजीनगर ते लोणीकाळभोर उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
पीएमआरडीएने हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. तर पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे काम महामेट्रोने घेतले आहे. पीएमआरडीए आणि महामेट्रोने दोन्ही मार्गांचे विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हिंजवडी ते शिवाजीनगर हा मार्ग लोणीकाळभोरपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला आहे. तर खडकवासला ते खराडी 28 किलोमीटर मार्ग महामेट्रोने प्रस्तावित केला आहे.
त्यानुसार पीएमआरडीएच्या विस्तारित मेट्रो मार्ग हा शिवाजीनगर पुलगेट, हडपसर आणि लोणीकाळभोर, तर एक फाटा सासवड रोडवर असा आहे. तर महामेट्रोचा खडकवासला हा मार्ग स्वारगेट, पुलगेट-हडपसर फाटा ते खराडी असा आहे. या दोन्ही मार्गावर पुलगेट ते हडसपर हा सुमारे आठ किलोमीटर लांबीचा मार्ग कॉमन (एकत्रित) असल्यामुळे तो कोणी विकसित करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
माण येथे मेट्रोसाठी कारडेपो आहे. तसेच लोणीकाळभोर या ठिकाणी देखील मेट्रोच्या कार डेपोसाठी आरक्षण ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पुलगेट ते हडपसर हा या मेट्रो मार्गाचे काम करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पीएमआरडीएची आहे. तर खडकवासला येथे मेट्रोसाठी कारडेपो करण्यात येणार आहे, त्यामुळे पुलगेट ते हडपसर या दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे काम आम्ही करतो, असे महामेट्रोचे म्हणणे आहे.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली यावर निर्णय घेण्यासाठी मध्यंतरी परिवहन प्राधिकरनाची (पुम्टा) बैठक झाली होती. या बैठकीला पुलगेट ते हडपसर दरम्यान आठ किलोमीटर मार्गाचा तांत्रिक व आर्थिक अहवाल पीएमआरडीए आणि महामेट्रोने स्वतंत्रपणे तयार करावा. त्यामध्ये आर्थिकदृष्ट्या कोणाचा प्रकल्प व्यवहार्य आहे. त्यावर कोणी त्या मार्गाचे काम करावे, यावर निर्णय घेण्यात यावा, असे ठरले होते. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पीएमआरडीए आणि महामेट्रोला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पीएमआरडीए आणि महामेट्रो यांची एकत्रित बैठका झाल्या. या बैठकीमध्ये तांत्रिक विषयांवर चर्चा झाली. हे तिन्ही मार्ग करण्याची तयारी दोन्ही संस्थांनी तयारी दर्शविली आहे.