पुणे – करोनाचे संकट बऱ्यापैकी दूर झाले असून, जागतिक आणीबाणी संपल्याचे “जागतिक आरोग्य संघटने’ने (डब्ल्यूएचओ) नुकतेच जाहीर केले आहे. दरम्यान, जगभरात हाहा:कार माजवणाऱ्या या रोगाचे उच्चाटन झाले असे म्हणता येणार नसले; तरी आता त्याला घाबरायची गरज नाही, हेच “डब्ल्यूएचओ’च्या संदेशातून सांगितले गेले आहे.
करोना व्हायरसने जगभरात 70 लाख नागरिकांचा मृत्यू झाला. अजूनही या व्हायरसची लागण झालेले बाधित सापडत आहेत, परंतु त्याचे प्रमाण कमी आहे. “डब्ल्यूएचओ’च्या आकडेवारीनुसार, जानेवारी 2021 मध्ये दर आठवड्याला एक लाखापेक्षा जास्त लोकांच्या मृत्यूचे असलेले प्रमाण आता आठवड्यात 3,500 पेक्षा कमी झाले आहे.
“डब्ल्यूएचओ’ ने सांगितले की 30 जानेवारी 2020 रोजी कोविडला “जागतिक आरोग्य आणीबाणी’ घोषित करण्यात आली. त्यावेळी चीनमध्ये 100 पेक्षा कमी करोना रुग्ण होते आणि एकाचाही मृत्यू झाला नाही, परंतु तीन वर्षांनंतर मृतांची संख्या 70 लाख झाली आहे. गेल्या वर्षभरात कोविडच्या प्रकरणांमध्ये झालेली घट लक्षात घेऊन सार्वजनिक जागतिक आरोग्य आणीबाणीतून करोना काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे “डब्ल्यूएचओ’कडून सांगण्यात आले.
कोविड प्रतिबंधक मोहीम
220 कोटी 66 लाख :
एकूण लसीकरण
95 कोटी 21 लाख :
जणांना दुसरी मात्रा
22 कोटी 87 लाख :
जणांना बूस्टर डोस