पुणे : राज्यातील सुप्रसिद्ध रांका ज्वेलर्सचे संचालक तसेच पुणे व्यापारी महासंघ, पुणे सराफ असोसिएशन, महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार संघटना, गोडवाड संघ या सर्व संस्थांचे अध्यक्ष फतेचंद रांका यांचा नुकताच राज्यस्तरीय आदर्श जीवन गौरव सेवा पुरस्कार २०२४ देत सन्मान करण्यात आला.
भूमी फाउंडेशन व ऑफिसर्स करियर अकॅडमी पुणे या संस्थेतर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह, येरवडा या ठिकाणी भूमी फाउंडेशनच्या चौथ्या वर्धापनदिनाच्या समारंभामध्ये फतेचंद रांका यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते यावेळी रांका यांना सन्मानित करण्यात आले.
इंडियन एअर फोर्सचे निवृत्त एअर मार्शल पद्माकर बापट, कामगार आयुक्तालयाचे सहआयुक्त अभय गीते, भारतीय एअर फोर्सचे माजी उप एअर मार्शल नितीन वैद्य नवचैतन्य हास्य योग्य परिवारचे संस्थापक विठ्ठल काटे, सिल्व्हर ग्रुपचे संचालक संतोषभाऊ बारणे, महाराष्ट्र राष्ट्रीय मानवाधिकार एवं सामाजिक न्याय आयोग दिल्ली, चे उपाध्यक्ष अखिलेश चौधरी आदी मान्यवर देखील यावेळी उपस्थितीत होते.
फतेचंद रांका यांना आतापर्यंत विविध संस्थांमार्फत आठ वेळा जीवन गौरव पुरस्कार व तीस वेळा वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. या व्यतिरिक्त सुमारे दीडशेपेक्षा अधिक अभिनंदन व सन्मानपत्र देऊन विविध संस्थांतर्फे सन्मानित करण्यात आले आहे. सन २००१ पासून फतेचंद रांका यांनी पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्षस्थान यशस्वीरित्या भूषविले आहे.
त्यांनी आत्तापर्यंत भारत सरकारने व्यवसायावर लावलेल्या एक्साईज ड्युटी, राज्य सरकारने लावलेली एलबीटी (LBT) साठी सरकारकडे पाठपुरावा करून त्यामधील जाचक कलमे दूर करण्यात यश मिळवलेले आहे. व्यापाऱ्यांच्या विरुद्ध होणाऱ्या अन्यायाविरुद्ध योग्य ती पावले उचलून व्यापाऱ्यांना खूप मोठा दिलासा देण्याचे काम त्यांनी यशस्वीरित्या पार पाडले आहे.
फतेचंद रांका यांनी सन १९८२ सालापासून स्वतःला सामाजिक व सांस्कृतिक म्हणजेच जनतेची व विशेषतः गोरगरिबांची सेवा करण्यात झोकून दिले आहे. गोरगरिबांच्या किडण्या निकामी झाल्यानंतर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये होणारा हजारो रुपयांचा खर्च वाचवण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन सारस डायलिसिस सेंटर येथे ११ डायलिसिस मशीन्स लावून फक्त रक्कम रुपये २००/- मध्ये डायलिसिस करून देत आहेत व त्यामुळेच गोरगरिबांना फार मोठा दिलासा मिळालेला आहे.
फतेचंद रांका यांनी आतापर्यंत लायन्स क्लब ऑफ पुन्हा सारसबाग यांच्या माध्यमातून मतिमंद मुलांसाठी होस्टेल, प्ले-ग्राउंड, होस्टेलवर सोलर सिस्टम, सारसबाग येथे दोन पाणपोई व टी. जी. गोसावी हायस्कूलमध्ये दोन मजली इमारत बांधून त्यामध्ये कॉम्प्युटर रूम व पहिल्या मजल्यावर सायन्स लॅबोरेटरी सर्व फर्निचर सहित व ३० कॉम्प्युटर सर्व साहित्यांसहित तसेच सध्या गोरगरीब वृद्धांसाठी गाव आंबी,
तालुका-मावळ, जिल्हा- पुणे (तळेगाव एमआयडीसीजवळ) येथे चार कोटी रुपये खर्च करून वृद्धाश्रम बांधण्याचे काम सुरू केले आहे. त्याचप्रमाणे दरवर्षी आपल्या स्टाफच्या दीडशेपेक्षा अधिक मुला-मुलींसाठी शालेय पुस्तके, वह्या, कंपास, पेन, पेन्सिल इ. लागणारे सर्व साहित्य गेल्या कित्येक वर्षांपासून देण्याचे उत्कृष्ट कार्य करीत आहेत.
फतेचंद रांका यांनी लायन्स क्लब इंटरनॅशनलचे बहुप्रांतीय कौन्सिलचे चेअरमन पद २०१०-२०११ मध्ये भूषविले असून या बहुप्रांतीयमध्ये येणारे महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड असे व तेराशेहून अधिक लायन्स क्लबला मार्गदर्शन केले आहे. २००९-२०१० मध्ये पुणे, नगर व नाशिक मिळून असलेला लायन्सच्या प्रांतास डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून मार्गदर्शन केले आहे.
सन १९९९ पासून महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे अध्यक्षपद यशस्वीरीत्या भूषवित आहेत. या सोबत राज्यस्तरीय आदर्श जीवन गौरव सेवा पुरस्कार २०२४ चे फोटो आपल्या प्रसिद्धीसाठी पाठवत आहे. कृपया वरील माहिती आपण आपल्या दैनंदिन वर्तमानपत्रात छापून सहकार्य करावे.