वीसगाव खोरे (पुणे)- पारंपरिक भात शेतीला फाटा देत नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्ट्रॉबेरीची शेती वीसगाव खोऱ्यातील गरुड वस्ती, खानापूर (ता. भोर) येथील प्रयोगशील शेतकऱ्यांने यशस्वी करून दाखवली आहे.
यासाठी रासायनिक खतांचा, औषधांचा वापर न करता सेंद्रिय आणि जिवाणू खताचा जास्तीत जास्त वापर करून नैसर्गिक पध्दतीने स्ट्रॉबेरीचे विक्रमी पीक घेतले आहे.
वीसगाव खोऱ्यातील गरुड वस्ती, खानापूर (ता. भोर) येथील स्वप्निल सीताराम मरगजे या युवा प्रगतशील शेतकऱ्याने रोहिडेश्वर गडाच्या डोंगर उतारावरील माळरानावर स्ट्रॉबेरीची शेती फुलविली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत 3 आर एवढ्या कमी क्षेत्रात महाबळेश्वर आणि जावळीतील अमोल अंबुले आणि प्रकाश गोळे या स्ट्रॉबेरी उत्पादकांचे मार्गदर्शन घेत व्हर्टिकल फार्मिंग, टेबल टॉप फार्मिंग, बेड फार्मिंग, ग्रो बॅग फार्मिंगचा प्रयोग या शेतीसाठी त्यांनी केला आहे.
मदरप्लांटपासून घरी तयार केलेली 2 हजार 800 रोपे महिन्याची झाल्यावर त्यांनी शेतात लागवड केली. यासाठी त्यांना त्यांचे आई, वडील, पत्नी, मुले याचे सहकार्य लाभले. सध्या स्ट्रॉबेरीचा पहिला बहर सुरू आहे. थंडीचे प्रमाण चांगले असल्यामुळे स्ट्रॉबेरी आकाराने मोठी व चवीला उत्तम असल्याने त्यास मागणी चांगली आहे. व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए, कॅल्शियम मॅग्नेशियम फॉलिक ऍसिड फॉस्फरस पोटॅशियम यांचे प्रमाण चांगले आहे.
ठिबक सिंचनाचे व्यवस्थापन
लागवड करताना “ग्रो बॅग’ भरताना 50 टक्के माती, 30 टक्के कोकोपीट, 20 टक्के कंपोस्टखताचा वापर करण्यात आला. बोअरवेलचा वापर करून ठिबक सिंचनाद्वारे रोपांसाठी पाण्याचे व्यवस्थापन करण्यात आले. जवळपास 70 हजार रुपये खर्च करून दोन टन स्टॉबेरीचे उत्पादन मिळण्याची अपेक्षा असून, 150 रुपये किलोने तीन लाखांचे उत्पन्न होण्याची शक्यता आहे.
“कमी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ठिबकद्वारे पाणी पुरवठा करून हा अभिनव प्रयोग केला आहे. पारंपरिक भात शेतीला फाटा देत नगदी असलेले स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग करीत आपल्या परिसरात भात शेतीऐवजी स्ट्रॉबेरी पिकांच्या सहाय्याने आर्थिक उन्नती करू शकतो, असा विश्वास निर्माण झाला.”
– स्वप्निल मरगजे, गरूड वस्ती, खानापूर, प्रगतशील शेतकरी (ता. भोर)