पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील 30 टपाल कार्यालयांमध्ये खास दिवाळीचा फराळ मायदेशी आणि परदेशी पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गेल्या आठ दिवसांपासून ते 81 देशांमध्ये पार्सल आणि स्पीड पोस्टने पाठविले जात आहेत.
आयटी तसेच इतर क्षेत्रात कार्यरत असणारे शहरातील अनेक नागरिक परदेशात वास्तव्यास आहेत. त्यांचे आई-वडील व इतर नातेवाईक त्यांना आर्वजून दिवाळीचा फराळ पाठवितात.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये वेगवेगळ्या देशांची नावे घेत फराळ पाठविण्याच्या व्यवस्थेबद्दल विचारणा केली जात असल्याचे दिसून येत आहे. काही देश तर असे आहेत, जिथे अगदी मोजक्याच कुरियर कंपन्या सेवा देत आहेत आणि त्यांनाही खूप वेळ लागत आहे.
कमी दरात ते पाठविण्याची सुविधा टपाल कार्यालयाने उपलब्ध करून दिली आहे. शहरातील विविध भागांमध्ये 30 टपाल कार्यालये कार्यरत आहेत. तेथून जपान, अमेरिका, इग्लंड, कॅनडा, ब्राझील, ऑस्ट्रेलिया आदी 81 देशांमध्ये ही सुविधा पुरविण्यात येते. त्यासाठी खास वेगळे दर आहेत. वजन आणि देशानुसार त्याचे दर ठरतात. 20 किलो वजनापर्यंत पदार्थ किंवा वस्तू पाठवितात येतात.
टपाल कार्यालयाने करोनाच्या काळात रुग्णांना वेळेवर औषध पुरविण्याची चोख जबाबदारी पार पाडली होती. आता दिवाळी फराळाचे पदार्थ पाठविण्याची सोय केली आहे. भारतासह परदेशातही हे पदार्थ पाठविता येतात. महसूलात प्रत्येक वर्षी वाढत होत आहे. यंदाही त्यात भर पडले, असे चिंचवड पोस्ट ऑफिसचे जनसंपर्क अधिकारी के. एस. पारखी यांनी सांगितले.