पुणे- करोना बधितांच्या, सक्रिय बाधितांच्या संख्येबरोबरच आता संशयितांची स्वॅब टेस्टची संख्याही कमी झाली आहे, हे दिलासादायक चित्र शहरात आहे. गेल्या 24 तासांत नव्या बाधितांची संख्या 55 नोंदवण्यात आली आहे. करोनातून बरे झालेल्यांची संख्या 86 झाली असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच दिवसभरात 3 हजार 533 संशयितांची स्वॅब टेस्ट करण्यात आली आहे.
सक्रिय बाधितांची संख्यादेखील गेल्या काही दिवसांपासून कमी झाली आहे, ही समाधानाची गोष्ट आहे. सक्रिय बाधितांची संख्या 861 आहे. सध्याच्या सक्रिय बाधितांमध्ये 143 जणांची प्रकृती गंभीर असून, 123 जणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. गेल्या 24 तासांतील बाधितांचा समावेश करून पाच लाख तीन हजार 859 एवढी आजपर्यंत बाधित संख्या झाली असून, 4 लाख 93 हजार 925 एवढे बाधित बरे झाले आहेत.