मुंबई – अमेरिकेच्या पतधोरण समितीची बैठक चालू असताना जागतिक शेअर बाजारात विक्रीचे वारे आहेत. भारतातून परदेशी गुंतवणूक परत जाईल या शक्यतेमुळे भारतीय शेअर बाजारात विक्री चालू आहे. त्यामुळे कालच्या प्रमाणे आजही शेअर बाजार निर्देशांकांत मोठी घट नोंदली गेली
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 329 अंकांनी कमी होऊन 57,788 अंकांवर बंद झाला. रष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 103 अंकांनी म्हणजे 0.60 टक्क्यांनी कमी होऊन 17, 221 अंकांवर बंद झाला.
बजाज फायनान्सचा शेअर आज तीन टक्क्यानी कोसळला. त्याचबरोबर बजाज फिन्सर्व, पावर ग्रिड, आयटीसी, टीसीएस या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. मात्र अशा परिस्थितीतही सनफार्मा, कोटक बॅंक, महिंद्रा, मारुती, एल अँड टी या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली.
महागाईमुळे जागतिक भांडवल परिस्थिती बिघडत चालली असताना काही देशांमध्ये ओमायक्रॉनच्या व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. त्याचा जागतिक व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता गुंतवणूकदारांना वाटत असल्यामुळे गुंतवणुकदार नफा काढून घेण्याच्या मनस्थितीत येत असल्याचे दिसून येत आहे.
रुपया घसरला
शेअर बाजारातून परकीय गुंतवणूक परत जात असल्यामुळे रुपयाच्या मूल्यावर दबाव कायम आहे. बुधवारी रुपयाचे मूल्य 44 पैशांनी कोसळून 76.32 रुपये प्रति डॉलर झाले. आता रुपयाची किंमत 20 महिन्याच्या नीचांकावर गेली आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून विक्री चालूच काल त्यानी 763 कोटी रुपयाच्या शेअरची विक्री केली. डॉलर वधारत असल्यामुळे आणि रुपयाचे मूल्य कमी होत असल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा भारतातील परतावा कमी होत असतो.
अस्थिरता रेंगाळणार
सलग चार दिवसापासून जागतिक अस्थिरतेमुळे निर्देशांक कमी होत आहेत. फेडरल रिझर्व्हच्या पतधोरण समितीची बैठक चालू आहे. ओमायक्रॉनमुळे तूर्त तरी फेडरल रिझर्व्ह व्याजदरात वाढ करणार नाही असे अनेकांना वाटते. मात्र व्याजदरात कधी वाढ करणार याचे वेळापत्रक फेडरल रिझर्व्हकडून सूचित केले जाण्याची शक्यता आहे.
त्या आधारावर गुरुवारच्या सत्रात कामकाज होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर गुरुवारी डेरिव्हेटिव्हजची मुदत संपते. त्यामुळे गुरुवारी शेअर बाजारात खरेदी-विक्रीच्या लाटा येऊ शकतात. त्यामुळे गुंतवणूदारांना सावध राहण्याचा सल्ला विश्लेषक देतात.