महाबळेश्वर – येथील पार्क यार्ड या हॉटेलमध्ये रहिमतुल्ला नदीम ईस्माईल (वय 33, रा. एटी चांदणी चौक, कराची पाकिस्तान) हा पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास होता. याबाबत हॉटेल मालक व व्यवस्थापक यांनी पोलीस ठाण्यास माहिती देणे बंधनकारक असताना माहिती न दिल्याने पोलीस हवालदार आर. बी. मोरमारे यांनी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली असून या तक्रारीवरून हॉटेल मालक तबरेज इकबाल सय्यद (वय 43) व व्यवस्थापक फारूक हशम वारुणकर (वय 46, रा. महाबळेश्वर) या दोघांवर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाबळेश्वर पोलिसांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली होती की महाबळेश्वर शहराजवळ असलेल्या द पार्क यार्ड या रिसॉर्टमध्ये 27 जुलै पासून रहिमतुल्ला नदीम ईस्माईल हा पाकिस्तानी नागरिक रूम नंबर 212 मध्ये वास्तव्यास आहे. या परकीय नागरिकाची माहिती हॉटेल मालक व व्यवस्थापकांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यास 24 तासांमध्ये कळविणे बंधनकारक होते. मात्र हॉटेल मालक व व्यवस्थापक यांनी स्थानिक पोलीस ठाण्यास याबाबत काही माहिती दिलेली नाही.
ही बाब निदर्शनास आल्यानंतर पोलीस हवालदार आर. बी. मोरमारे यांनी याबाबतची पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पार्कयार्ड हॉटेलचे मालक तबरेज इकबाल सय्यद व व्यवस्थापक फारूक हशम वारुणकर यांच्यावर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात भादवी 188 सह विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 चे कलम 14 (सी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा तपास पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडुभैरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्रीकांत कांबळे करीत आहेत.