87 हजार मिळकतींना करसवलत

अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर करणे फायद्यात

पुणे – सोलर वॉटर हिटर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, गांडूळखत आदी अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर करणाऱ्या नागरिकांना महापालिकेतर्फे आकारल्या जाणाऱ्या मिळकत करामध्ये 5 ते 10 टक्‍क्‍यांची सूट दिली जाते. शहरातील सुमारे 86 हजार 836 मिळकतींनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत पुणेकर अपारंपरिक ऊर्जास्रोतांच्या वापराला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे.

महापालिकेतर्फे नुकत्याच प्रकाशित झालेल्या पर्यावरण सद्यःस्थिती अहवालातून ही बाब समोर आली आहे. गेल्या दोन दशकांमध्ये शहराचा विकास झपाट्याने होत आहे. अत्यंत वेगाने वाढणाऱ्या नागरीकरणामुळे शहर विकासाच्या दिशेने धावत असले, तरी पर्यावरणाचा मात्र ऱ्हास होत आहे. त्यामुळे एकेकाळी सायकलींचे शहर अशी ओळख असणारे पुणे आता आशिया खंडातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत मोडते. त्या पार्श्‍वभूमीवर गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणाचा समतोल राखण्यावर महापालिकेतर्फे भर देण्यात येत आहे. नागरिकांनी अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर करावा, यासाठी महापालिकेच्या वतीने गेल्या दहा वर्षांपासून प्रोत्साहन योजना राबवली जात आहे. या अंतर्गत शहरातील पारंपरिक ऊर्जास्रोतांवरचा ताण कमी करण्यासाठी अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर करणाऱ्या मिळकतधारकांना महापालिकेतर्फे करआकारणीमध्ये 5 ते 10 टक्‍के सूट दिली जाते. दहा वर्षांपूर्वी या योजनेचा लाभ घेणाऱ्यांचे प्रमाण अवघे 1 हजार 265 इतके होते.

…पण वेळोवेळी पाहणी होते का?
ज्या सदनिकाधारकांना किंवा सोसायट्यांना सौरऊर्जा, रेनवॉटर हार्वेस्टिंग किंवा कचरा प्रक्रिया प्रकल्प केल्यामुळे करांत सूट देण्यात आली आहे. ते सुरू आहेत का? याची दरवर्षी संबंधित क्षेत्रीय कार्यालयांनी पाहणी करणे आवश्‍यक आहे. मात्र, तसे केले जात नाही. या तीन प्रकल्पांपैकी गांडूळखत प्रकल्प अर्थात कचरा प्रक्रिया प्रकल्प हा पहिल्या वर्षांतच बंद करण्यात आलेला असतो. असे असताना त्याची करातील सूट सुरूच असते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.