आ. मकरंद पाटील यांच्याकडे जिल्हा बॅंकेची सूत्रे?

रिक्त संचालकपदी बिनविरोध निवड; ना. रामराजेंच्या अनुपस्थितीमुळे चर्चेला उधाण

बॅंकेच्या परिसरात फटाक्‍यांची आतषबाजी
आमदार मकरंद पाटील यांची संचालकपदी निवड झाल्यानंतर सर्व संचालकांनी बॅंक परिसरातील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आ. पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी परिसरात फटाक्‍यांची माळ वाजवून आनंद व्यक्त केला व त्याचबरोबर खा. शरद पवार आणि स्व. लक्ष्मणराव पाटील यांचा नावाचा जयघोष करून परिसर दणाणून सोडला. 

सातारा – देशात नावलौकिक असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची सूत्रे आमदार मकरंद पाटील यांच्याकडे जाण्याची शक्‍यता आहे. बुधवारी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा मुंबई येथे भाजप प्रवेशाचा कार्यक्रम होत असताना दुसऱ्या बाजूला जिल्हा बॅंकेत आ. मकरंद पाटील यांची रिक्त संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली. दरम्यान, यावेळी ना. रामराजे नाईक निंबाळकर अनुपस्थित राहिल्यामुळे आपसुकच बॅंकेच्या परिसरात चर्चांना उधाण आले होते.

माजी खासदार कै. लक्ष्मणराव पाटील यांच्या निधनानंतर जिल्हा बॅंकेचे संचालकपद रिक्त झाले होते. त्यानंतर महिनाभरापूर्वी नूतन संचालकांची निवड करण्याचे निश्‍चित करण्यात आले. त्यासाठी सर्व संचालकांनी एकमताने आ. मकरंद पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. त्यामुळे आ. पाटील यांची बिनविरोध निवड झाली होती. मात्र, निवडीची घोषणा करण्यासाठी राष्ट्रवादीने बुधवारी मुहूर्त साधला.

एका बाजूला राष्ट्रवादीची सत्ता असलेली जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादी बॅकफूटवर गेल्याचे चित्र निर्माण झाले. मात्र, त्यावर राष्ट्रवादीने बुधवारीच आ. पाटील यांच्या संचालकपदी निवड झाल्याची घोषणा करून मास्टरस्ट्रोक देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, जिल्हा बॅंकेतील निवड बैठकीला आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मामा दादाराजे खर्डेकर यांच्यासह आ. शशिकांत शिंदे, उपाध्यक्ष सुनील माने, आ. बाळासाहेब पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, माजी आ. प्रभाकर घार्गे, कांचन साळुंखे, राजेंद्र राजपुरे आदी उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.