नागपूर: माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे केंद्रात वजन आहे. राज्यहिताचा विचार करून त्यांनी हे वजन वापरून निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीच्या निमित्ताने मदत मिळवून द्यावी, असे आवाहन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
यावेळी त्यांनी विरोधी पक्षाचं काम आरोप करणे असते. त्याचा खुलासा करण्याची आम्हाला संधी मिळते, असे म्हणत फडणवीसांना टोला लगावला.
विजय वडेट्टीवार म्हणाले, सध्या आरोप करणे हेच विरोधी पक्षनेत्यांचं काम असल्याचे दिसून येत आहे; परंतु त्याचा खुलासा करण्याची संधी आम्हाला मिळते. 18 जुलै रोजी फडणवीस यांनी संध्याकाळी आरोप केला की, आमचा प्रस्ताव सकाळी गेला होता. निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसान भरपाईसाठी केंद्राकडून मदत मिळावी म्हणून राज्य सरकारने केंद्राला प्रस्ताव पाठवला आहे. 18 जुलै रोजी प्रस्ताव केंद्र सरकारच्या गृहविभागाकडे पाठवला आहे.
एनडीआरएफमधून 1 हजार 65 कोटी रुपयांची मदत मिळावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला आहे. एनडीआरएफच्या नियमानुसार ही प्राथमिक मागणी आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं केंद्रात वजन आहे. त्यांनी महाराष्ट्राला मदत मिळवून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.