नवी दिल्ली – करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर बऱ्याच राज्यांमध्ये निर्बंध लागू करण्यात आले होते. त्याचा परिणाम कारखानदारीवर झाला होता. मात्र आता बऱ्याच राज्यांमध्ये निर्बंध कमी करण्यात येत आहेत. त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील उत्पादन वाढण्यास मदत होऊ लागली आहे.
जून महिन्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स म्हणजे पीएमआय तब्बल 55.3 इतका नोंदला गेला आहे. जून महिन्यामध्ये हा निर्देशांक केवळ 48.1 टक्के इतका होता. तीन महिन्यात प्रथमच निर्देशांक इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पीएमआय निर्देशांक जर 50 अंकाच्या वर असेल तर हे क्षेत्र विस्तारत आहे असे समजले जाते. जून महिन्यामध्ये हे क्षेत्र निर्बंधांमुळे संकोचले होते.
आता बऱ्याच राज्यातील निर्बंध कमी होत आहेत. त्यामुळे आगामी काळामध्ये या क्षेत्राची उत्पादकता वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कारखान्यातील उत्पादन मागणी वाढल्यामुळे वाढत आहे. त्याचबरोबर जीएसटीचे संकलनही वाढू लागले आहे. महामार्गावरील वाहतूक वाढत आहे. त्यामुळे एक-दोन महिन्यांमध्ये एकूणच आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
आणखी करोनाची दुसरी लाट आटोक्यात आली नसताना तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येऊ लागली आहे. त्यामुळे आगामी काही काळ तरी रिझर्व्ह बॅंक आणि अर्थ मंत्रालय उत्पादकतेला चालना देणारे धोरण जाहीर करण्याची शक्यता आहे. या आठवड्यामध्ये रिझर्व्ह बॅंकेचे पतधोरण जाहीर होणार आहे. एकूण परिस्थिती पाहता रिझर्व्ह बॅंक आणखी दोन महिने तरी व्याज दरात कसलाही बदल करणार नाही असे समजले जाऊ लागले आहे.