फेसबुककडून ग्राहकांसाठी “लिब्रा’ क्रिप्टोकरन्सी जारी

जगभरात 2 अब्ज ग्राहकांना मिळणार लाभ

सॅन फ्रान्सिस्को- सोशल मिडीयाच्या विश्‍वातील अग्रणी “फेसबुक’ने आपल्या ग्राहकांसाठी क्रिप्टोकरन्सीचे दालन खुले केले आहे. “लिब्रा’ असे नाव या क्रिप्टो करन्सीला देण्यात आले आहे. या आभासी चलनाच्या आधारे फेसबुकच्या ग्राहकांना पैशाची बचत, पैसे पाठवणे आणि खर्च करणे अगदी सोपे होणार आहे. एखादा “मेसेज’ पाठवण्याइतके हे सोपे असणार आहे, असे फेसबुकने म्हटले आहे. आज या क्रिप्टो करन्सीचे उद्‌घाटन करण्यात आले. यामुळे क्रिप्टोकरन्सी मुख्य प्रवाहात येईल, असेही फेसबुकने म्हटले आहे.

ऍप, सर्व्हिसेस किंवा उद्योगांमध्ये वापर करण्यासाठी उत्सुक असलेल्यांसाठी “लिब्रा’चा प्रोटोटाईप फेसबुक आणि सुमारे दोन डझन अन्य भागीदार कंपन्यांनी मिळून आज प्रसिद्ध केला. पुढील वर्षी “लिब्रा’जागतिक पातळीवरील डिजीटल चलन म्हणून विकसित केले जाणार आहे.

जिनिव्हातील एक नामांकित स्वयंसेवी संघटना “लिब्रा’च्या मानकावर देखरेख करणार आहे. या उपक्रमामुळे ज्यांची बॅंकेत खातीही नाहीत, अशी तब्बल अब्जावधी लोक याद्वारे वाणिज्य आणि वित्तीय सेवांचा लाभ ऑनलाईन घेऊ शकतील, असे “लिब्रा असोसिएशन’चे धोरण विभाग प्रमुख दांत दिस्पार्ते यांनी सांगितले. अत्यंत अल्प दरात पैसा आणि संधी उपलब्ध करून दिली तर आतापेक्षाही अधिक स्थैर्य मिळू शकेल, असा दावा त्यांनी केला.

“लिब्रा’ने वित्तीय सेवांशी संबंधित 28 कंपन्यांना सदस्य करून घेतले आहे. पारंपारिक वित्तीय नेटवर्क आणि डिजीटल करन्सी टेक्‍नोलॉजीतील भेद भरून काढण्याचे काम “लिब्रा’ करणार आहे. फेसबुक वापरणारे अनेक ग्राहकांचे देश बॅंकांच्या व्यवहारात मागे आहेत. त्यांना या “लिब्रा’चलनाचा लाभ होणार आहे.

बॅंक, क्रेडिट कार्ड सर्व्हिस, ई कॉमर्सचे व्यवहार प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या पण स्मार्टफोनद्वारे वापरण्यात येणाऱ्या ई वॉलेटद्वारे केले जाऊ शकतात. बिटकॉईनसारख्या क्रिप्टोकरन्सीकडून “लिब्रा’ने धडे घेतले आणि या डिजीटल चलनातील संभाव्य धोक्‍यांचाही अभ्यास केला.”लिब्रा’द्वारे वापरला जाणाऱ्या प्रत्यक्ष चलनाचे मूल्य डॉलर किंवा युरोप्रमाणे अंशतः स्थिर असेल.यासाठी ब्लॉकचेनची रचना केलेली असेल. वैधता तपासणी आणि व्यवहार नोंदणीसाठी कॉम्प्युटरच्या 100 नोडची साथही असेल.

ग्राहकांच्या माहितीच्या चोरीच्या प्रकरणामुळे फेसबुकची जगभरात जी नाचक्‍की झाली त्यातून स्वतःची प्रतिमा सावरण्यासाठी फेसबुकने या क्रिप्टो करन्सीचा आधार घेतला आहे. छोटे ग्रुप, खासगी मेसेज आणि पेमेंटबाबत फेसबुकला नवी दिशा देण्याचे आश्‍वासन फेसबुकचे मुख्य कार्यकारी मार्क झुकेरबर्ग यांनी दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.