मुंबई – मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात दि. 9 ते 12 जून या चार दिवसांच्या काळात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या चार दिवसांच्या काळात आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित काम करणाऱ्या सर्व यंत्रणेने, सर्व जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेने सज्ज आणि सतर्क राहून काम करावे, असेही निर्देश देण्यात आले आहे.
अतिवृष्टीच्या या काळात आवश्यक तिथे एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या तैनात कराव्यात, ओएनजीसी सह इतर केंद्रीय संस्थांना या काळात होणाऱ्या अतिवृष्टीची माहिती देऊन सतर्क राहण्यास सांगण्यात यावे, असेही कळविण्यात आले आहे. हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने मुंबई महानगर क्षेत्र, कोकणातील सर्व जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा घेतला.
उद्धव ठाकरे म्हणाले, या अतिवृष्टी काळात गरज पडल्यास मदतीसाठी तटरक्षकदल, नौदलाला तयार राहण्याची सुचना कळवण्यात यावी. किनारपट्टी भागात होणाऱ्या या अतिवृष्टीची माहिती स्थानिक प्रशासनाने नागरिकांनाही द्यावी, या काळात नद्यांचा प्रवाह बदलतो आणि त्यामुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरते हे लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांची काळजी घ्यावी.
जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठका घेऊन जिल्ह्यातीलआपत्ती व्यवस्थापनाच्या कामांचा तातडीने आढावा घ्यावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.
अतिवृष्टी झाल्यास वीज पुरवठा खंडित होऊ शकतो हे लक्षात घेऊन रुग्णालयांनी पर्यायी व्यवस्था तयार ठेवावी. जनरेटर्स, डिझेलचा साठा, ऑक्सीजनचा साठा करून ठेवावा.
वीजेचे बॅकअप कशा पद्धतीने घेता येईल याची पर्यायी व्यवस्था करून रुग्णसेवेत कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच अतिवृष्टीमुळे कोविड केअर सेंटर्समधील रुग्णांना अडचण होणार नाही, येथे पाणी साचणार नाही याची काळजी घेण्याची गरज ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.