पिंपरी – महावितरणने पिंपरी चिंचवड शहरातील ग्राहकांना मार्च महिन्याच्या वीज बिलांसोबत अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिल देवून भर उन्हाळ्यात अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा “शॉक’ दिला आहे. तसेच काहींना एकाच महिन्यात एकाहून अधिक बिले पाठविली आहेत. त्याचा संदर्भ लागत नसल्याने नागरिक तसेच उद्योजक संतप्त झाले आहेत. तर, पिंपरी चिंचवडमधील लघु उद्योजकांनी ही सुरक्षा ठेव भरणार नसल्याचे जाहीर केले.
शहरातील अनेक ग्राहकांना अशी बिले देण्यात आली आहेत. महावितरणने पाठवलेल्या बिलात याचा कसलाच उल्लेख नाही. तसेच पाठविलेले बिल हे नेहमीच्या वापराच्या दुप्पट, तिप्पट आहे. त्यामुळे ग्राहकांना चांगलाच आर्थिक भुर्दंड बसणार आहे. सध्या शहरात अघोषित भारनियमन सुरू आहे. दिवसातून कित्येक वेळा वीज गायब असते. तरीही किमान 2 हजार व त्यापेक्षा कित्येक हजारात हे बिल आल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. कंपनीने पाठवलेल्या बीलांत याचा कसलाच उल्लेख नाही. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमवस्था आहे. अनेक ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे वेगळे व नियमित बिल दुप्पट, तिप्पट आले आहे.
महावितरणच्या वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र बिल देण्यात येत आहे. जमा असलेल्या सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना दरवर्षी मिळणारी व्याजाची रक्कम वीज बिलामध्ये समायोजित केली जाते. 1 एप्रिल 2022 पासून नवीन वीजदर लागू करण्यात आले आहे. त्यामुळे सरसकट वीज दरवाढ झाल्याचा आरोप चुकीचा असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या दि. 1 एप्रिल 2022 पासून लागू असलेल्या वीजदरानुसार महावितरणकडून वीजबिलांची आकारणी करण्यात येत आहे. विद्युत नियामक आयोगाने मागविलेल्या अभिप्रायानुसार ग्राहकांची सुरक्षा ठेव सरासरी देयकाच्या दुप्पट तसेच त्रैमासिक बिल असलेल्या ग्राहकांची सुरक्षा ठेव दीडपट करण्याची करण्याची तरतूद आयोगाकडून करण्यात आली आहे. सुरक्षा ठेवीची बिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
आयुष्यभरासाठी अघोषित भारनियमन
महावितरणच्या कारभाराने उद्योजक देखील वैतागले आहेत. पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी सांगितले की, काही दिवसांमध्ये भारनियमन सुरू होणार आहे. परंतु उद्योगांना आयुष्यभरासाठी अघोषित भारनियमन सहन करावे लागत आहे. नियमित वीज पुरवठा होत नसल्याने उद्योगांचे मोठे नुकसान होत आहे.
तरी देखील दरवर्षी मार्च महिन्यानंतर अतिरिक्त सुरक्षा ठेव मागितली जाते. स्थिर आकार आणि इतर शुल्क भारनियमनाच्या तुलनेत कमी होणार आहेत का? आधीच महावितरणमुळे खूप नुकसान झाले आहे आणि होत आहे. त्यामुळे सुरक्षा ठेवीची रक्कम न भरण्याचा निर्णय घेतला आहे. अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या नावाखाली पाच हजार ते पाच लाख रुपये घ्यायचा प्रयत्न आहे.