पुणे – जगभरात पसरलेल्या करोनामुळे शिक्षणालादेखील मोठा फटका बसला आहे. अनेक देशांमध्ये अद्याप शाळा, महाविद्यालये बंदच आहेत. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग परीक्षा लांबणीवर टाकत आहे. तारीख पे तारीख देण्याबाबत आयोगाची ही दुसरी वेळ आहे. परीक्षा गेल्या लांबणीला अन् विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला अशी अवस्था विद्यार्थ्यांची झाली आहे.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगकडून घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा तसेच दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा- 2020 आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा- 2020 यांचे बदललेले वेळापत्रक आयोगाने नुकतेच जाहीर केले आहे. या बदललेल्या वेळापत्रकानुसार सर्व परीक्षा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यात घेतल्या जाणार आहेत.याआधी या परीक्षा सप्टेंबरमध्ये घेतल्या जाणार होत्या. एमपीएससीच्या सुधारित वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा 11 ऑक्टोबर 2020, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 1 नोव्हेंबर 2020 रोजी आणि दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा-22 नोव्हेंबर 2020 या तारखेला होणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार हे बदललेले वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. गेल्याच महिन्यात बदलली होती त्यामुळे विद्यार्थ्यांना ही परीक्षा लवकरच होणार अशी आस लागली हेती. परंतू आत्ता पुन्हा परीक्षा लांबल्याने विद्यार्थी अभ्यास करावा की नाही या द्विधावस्थेत सापडले आहेत.