पाझर तलाव तुडुंब : बाजरी, मका, सोयीबानचे नुकसान, आडसालीत पाणीच पाणी
बारामती- बारामती तालुक्यात ढगफुटी झाल्याने ओढे-नाले तसेच जलसंधारणाच्या कामातून निर्माण झालेले पाझर तलाव तुडुंब भरले आहेत. अनेक दिवस पावसाळी प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना पावसामुळे दिलासा मिळाला असला तरी देखील बाजरी, मका, सोयाबीन, उसाचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बारामती शहर व तालुक्यात चार दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता. उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. रविवारी सायंकाळी शहर व तालुक्यात सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाटात अक्षरशः ढगफुटी झाल्यासारखा पाऊस पडला. पावसामुळे जलसंधारणाच्या सर्व कामात तुडुंब पाणी भरले. सिमेंट बंधारे, नाले ओढे, तलावासह विहिरींच्या पाण्याची पातळीही वाढली आहे. तालुक्याच्या पावसाची सरासरी एकाच पावसाने ओलांडली. त्यामुळे तालुक्यातील बळीराजा सुखावला आहे.
- नुकसानीचा पाहणी दौरा
बारामती तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी तालुक्यातील साबळेवाडी, सुपे, बोरकरवाडी, कारखेल, उंडवडी सुपे भागाचा दौरा करून नुकसानीची पाहणी केली. अनेक ठिकाणी उसाच्या पिकासह बाजरी, मका, सोयाबीनचे नुकसान झाले आहे, उंडवडी, सुपे येथे घरात पाणी शिरून नुकसान झाले आहे. अंजनगाव येथे एका पोल्ट्रीशेडचेही नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार पाटील यांनी दिली.
- तालुक्यातील पावसाची आकडेवारी
उपलब्ध आकडेवारीनुसार बारामती तालुक्यात गाडीखेल येथे सर्वाधिक म्हणजे तब्बल 172 मिलीमीटर इतका पाऊस काही तासात कोसळला आहे. पावसाची आकडेवारी (मि.मी. मध्ये) पुढील प्रमाणे : बारामती- 105, उंडवडी क. प.- 95, सुपे- 110, लोणी भापकर- 71, माळेगाव कॉलनी- 86, वडगाव निंबाळकर- 60, पणदरे- 80, मोरगाव 67, लाटे- 62, बऱ्हाणपूर- 110, सोमेश्वर कारखाना- 42, जळगाव कडेपठार- 120, आठ फाटा होळ- 67, माळेगाव कारखाना- 50, मानाजीनगर- 87, चांदगुडेवाडी- 82, काटेवाडी- 68, अंजनगाव- 130, सोनवडी सुपे- 131, जळगाव सुपे- 100, कृषी विज्ञान केंद्र- 70, सोनगाव- 56, कटफळ- 152, सायंबाचीवाडी- 68, चौधरवाडी- 59, नारोळी- 60, काऱ्हाटी- 84, गाडीखेल- 172, जराडवाडी- 130.