पुणे -पुणे रेल्वे मंडळात प्रवाशांच्या सुविधेच्या दृष्टीने आवश्यक त्या सुविधा उभारण्यावर भर देण्यात आहे. खडकी रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक चारचा विस्तार, हडपसर रेल्वे टर्मिनस विकसित करणे, पुणे रेल्वे स्थानकाचा सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे, असा विश्वास मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापक इंदूराणी दुबे यांनी व्यक्त केला.
कार्यभार स्वीकारल्यानंतर दुबे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेतपुणे विभागाशी संबंधित विविध योजनांची माहिती दिली. अपर व्यवस्थापक बी. के. सिंह, वरिष्ठ अभियंता पी. के. चतुर्वेदी, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ वाहतूक व्यवस्थापक डॉ. स्वप्नील नीला, वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त उदयसिंह पवार, जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर आदी उपस्थित होते.
दुबे म्हणाल्या, “पुणे रेल्वे स्थानक इमारतीचा पुनर्विकास करण्यासाठी वास्तुविशारद नेमण्यात येईल. येथील दोन फलाटावरच सध्या 26 डब्यांच्या ट्रेन उभ्या करता येऊ शकतात. पण, रिमोल्डिंगचे काम पूर्ण झाल्यावर सर्वच स्थानकांवर 26 डब्यांच्या ट्रेन उभ्या करता येतील. यासाठीचा आराखडा 15 दिवसांत सादर केला जाणार आहे. त्यानंतर दीड ते दोन महिन्यांत प्रत्यक्ष काम सुरू होईल. सध्या येथे पाच लिफ्ट मंजूर असून, चार लिफ्टच्या जागा निश्चित झाल्या आहेत. त्या बसविण्याची कार्यवाही लवकरच सुरू होईल. प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी रॅम्प सुविधेबाबतही नियोजन करण्यात येणार आहे. स्थानकातील सीसीटीव्ही अत्याधुनिक स्वरुपाचे बसवण्यात येतील. येथील हडपसर टर्मिनल विकासासाठी गतीशक्ती युनिटची नेमणूक केली आहे. त्यामुळे टर्मिनलच्या कामाला गती मिळेल. लांब पल्ल्याच्या ट्रेनची संख्यावाढ, आयोध्येसाठी स्वतंत्र ट्रेन आदींबाबतही प्रयत्न करण्यात येतील.’
पुणे-लोणावळा-पुणे लोकल वाढविणार
पुणे-लोणावळा-पुणेदरम्यान धावणाऱ्या लोकलच्या दुपारच्या फेऱ्या पूर्ववत झालेल्या नाहीत. त्यामुळे या मार्गावरील विद्यार्थी आणि नोकरदारांची गैरसोय होत आहे. यावर दुबे म्हणाल्या, “सुविधेच्या दृष्टीने दुपारच्या वेळेतील लोकलच्या फेऱ्या पूर्ववत करण्यात येतील. पुणे-दौंड मार्गावर डेमू लोकलऐवजी पुढील काळात “मेमू’ लोकल चालविण्यात येणार असून, डब्यांची संख्याही वाढविली जाईल.’
खडकी स्थानकाचाही विस्तार
खडकी रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक चारच्या विस्तार आणि विकासासाठी मध्य रेल्वेकडून 29 कोटी रुपयांचा प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे पुढील सहा ते सात महिन्यांत हे काम पूर्ण होऊ शकणार आहे.