- भाजप नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांची मागणी
पिंपरी – टाटा मोटर्स ही वाहन उत्पादक कंपनी पिंपरी-चिंचवड शहराचे भूषण आहे. शहराच्या प्रगतीमध्ये या कंपनीचा सिंहाचा वाटा आहे. “टाटा मोटर्स’ या जगविख्यात कंपनीवर कारवाई करताना प्रसिद्धीसाठी स्टंट करणाऱ्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या अधिकाऱ्यांना समज देण्याची मागणी सत्ताधारी भाजप नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांनी केली आहे.
नगरसेविका बोऱ्हाडे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोन दिवसांपूर्वी टाटा मोटर्स कंपनीला पिंपरी-चिंचवड महापालिका करसंकलन विभागाने नोटीस बजावली. त्यामुळे टाटा मोटर्स, पिंपरी-चिंचवड महापालिका व शहराची प्रतिमा राष्ट्रीय स्तरावर मलीन झाली. ही कंपनी पिंपरी-चिंचवड शहराचे भूषण आहे. शहराच्या झालेल्या प्रगतीमध्ये नक्कीच कंपनीचे मोठे योगदान आहे. या कंपनीमध्ये हजारो कर्मचारी काम करतात. तसेच, शेकडो लघु उद्योग या कंपनीवर अवलंबून आहेत. ही कंपनी उद्योगनगरी असलेल्या शहराचा कणा आहे. त्यामुळे कंपनीची अशाप्रकारे कोणतीही माहिती देताना संबंधित अधिकाऱ्यांनी तारतम्य बाळगणे गरजेचे होते.
टाटा समुहाने कायम सामाजिक बांधिलकी जपली आहे. जगभरात सर्वाधिक दान करणारे कुटुंब म्हणून नुकताच टाटांचा गौरवही झाला आहे. करोना काळातही टाटा मोटर्स कंपनीच्या वतीने जगभरात मदत करण्यात आली. शहराच्या विकासात कंपनीचे योगदान आहे. त्यामुळे या कंपनीची माजी कर्मचारी असल्याचा मला अभिमान असल्याचेही बोऱ्हाडे यांनी म्हटले आहे.
कर संकलन विभागाकडून केलेली कारवाई ही रास्त असेलही, पण प्रसिद्धी माध्यमांना माहिती देऊन पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्टंटबाजी करू नये. यामुळे कंपनी व्यवस्थापन आणि कामगार वर्गामध्ये महापालिका प्रशासनाबाबत नकारात्मक संदेश जात आहे. त्यामुळे टाटा मोटर्ससह शहराचे भूषण असलेल्या अनेक संस्थांवर कारवाई करताना अधिकाऱ्यांनी समंजसपणा दाखवला पाहिजे. पिंपरी-चिंचवडमधील उद्योगक्षेत्राची भावना लक्षात घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना योग्य ती समज द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.