निरोगी जीवनासाठी व्यायाम आवश्‍यकच – डॉ. रघुनाथ माशेलकर

पुणे – शारीरिक तंदुरुस्ती हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. जर शरीर तंदुरुस्त असेल तरच तुम्ही चांगल्या मनाने अन्य सर्व गोष्टी यशस्वीरित्या पूर्ण करू शकता. त्यामुळेच प्रत्येकाने दररोज किमान अर्धा ते पाऊण तास व्यायामाकरिता राखून ठेवला पाहिजे असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी येथे सांगितले.

महाराष्ट्रीय मंडळातर्फे दिला जाणारा शिवरामपंत दामले स्मृती क्रीडा पुरस्कार ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय ऍथलिट व प्रशिक्षक राम भागवत यांना माशेलकर यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. ऍड्‌. नंदू फडके, एअरमार्शल (निवृत्त) भूषण गोखले, मंडळाचे सरचिटणीस धनंजय दामले हे यावेळी उपस्थित होते.

माशेलकर यांनी पुढे सांगितले की, ज्ञान, बुद्धी, व्यक्ती व मूल्ये आदी संवर्धनाचे कार्य शिक्षक करीत असतो. बदलत्या काळानुसार शिक्षण व क्रीडा क्षेत्रात होणारे बदल समजावून घेणे आवश्‍यक आहे. शरीर संवर्धनात बदल होत नसतो. शारीरिक शिक्षण व आरोग्य संवर्धन या चिरकालीन आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतास ऍथलेटिक्‍समध्ये घवघवीत यश मिळविण्यासाठी अव्वल दर्जांच्या प्रशिक्षकांची गरज आहे. शिवाकाकांमुळेच आमच्या पिढीतील अनेक युवकांनी क्रीडा क्षेत्रात करिअर केले. दैनंदिन जीवन निरोगी राहण्यासाठी व क्रीडा कौशल्य संपादन करण्यासाठी शारीरिक स्वाथ्य व ताकदीची गरज आहे असे भागवत यांनी सांगितले.

युवा पिढीने सेल्फी काढण्यापेक्षा चांगले काम करीत प्रतिष्ठा निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे. भावी नागरिक बनण्यासाठी युवा जीबनात कसा भक्कम पाया रचला जाईल याकडे युवा पिढीने वेळ दिला पाहिजे असे आवाहन गोखले यांनी केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.