पाण्यासाठी विधानसभा मतदानावर बहिष्काराचा इशारा

सविंदण्याच्या डोंगराकडेने दुष्काळी गावांना पोटचारी करण्याची मागणी

सविंदणे-येथील डोंगराच्या कडेने दुष्काळी गावांना डिंभे कालव्यातून पोटचारी करण्याची मागणी होत आहे. पावसाळ्यातही लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याने परिसरातील गावे विधानसभेला मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत.

अद्याप पुरेसा पाऊस न झाल्याने पेरणी झाली नाही. पिकाचे सोडा; पण पिण्यासही पाणी उपलब्ध नाही. सध्या पावसाळ्यात पाऊस न झाल्याने कान्हूर मेसाई, मांदळेवाडी, मिडगुलवाडी, वडगाव पीर, खैरवाडी या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरू आहेत. भयाण दुष्काळ सदृश परिस्थिती ही व्यथा आहे, शिरूर तालुक्‍यातील कान्हूर मेसाई, मांदळवाडी, मिडगुलवाडी, घोलपवाडी, खैरवाडी, ढगेवाडी, शास्ताबाद, फलकेवाडी सविंदणे येथिल डोंगरभाग, कोळेकरवस्ती या भागांची.

या गावांशेजारून 6 ते 7 किलोमीटर अंतरावरून डिंभा धरणाच्या कालव्याचे पाणी चुकीच्या मार्गाने वळविल्याने ही गावे पाण्यापासून वंचित राहिली व तेथील विकास खुंटला. तेथील ग्रामस्थांनी अनेक वर्षापासून पोटचारी होण्यासाठी बऱ्याचदा मंत्र्यांना लेखी निवेदने दिली. पण पाणी काही मिळाले नाही. सध्या पाण्याअभावी या भागातील नागरिकांचे खूप हाल होत असून पशुधन कसे जगवावे? हा मोठा प्रश्न पडला असून ही गावे विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकणार आहेत. गेल्या चार-पाच वर्षांपासून पोटचारी करावी या मागणीसाठी अनेकदा येथील नागरिकांनी खासदार, आमदार, पालकमंत्री, मुख्यमंत्री यांना प्रत्यक्ष भेटून लेखी निवेदने दिली आहेत. पण पाण्याचा प्रश्न काही सुटला नाही. “सबका विकास’ दूरच; पण किमान जगायला पाणी द्या, अशी आर्त मागणी परिसरातील नागरीक करीत आहेत.

  • अनेक वर्षांपासूनची पोटचारीची आमची आग्रही मागणी आहे. अनेक हेलपाटे मारूनही पोटचारी होत नाही. दुष्काळी परिस्थितीमुळे आमचे पाण्यावाचून प्रचंड हाल होत आहेत. पोटचारी तयार झाली तर बराचसा भाग ओलिताखाली येणार येईल व पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात येईल.
    -मयूर कोळेकर, सामाजिक कार्यकर्ते

Leave A Reply

Your email address will not be published.