अभिनेता – मॉडेल मिलिंद सोमणने वयाच्या 56 व्या वर्षी देखील स्वतःला तंदुरुस्त ठेवले आहे. त्याची तंदुरुस्ती आणि उत्साह-उर्जा या वयातही तरूणांना लाजवेल अशी आहे. तंदुरुस्त आणि निरोगी राहू इच्छिणाऱ्यांसाठी मिलिंद सोमण हा प्रेरणास्थान ठरू शकतो. तो सोशल मिडियावरही सक्रीय असतो आणि सायकलिंग, धावणे, पुशअप्स, जिममधील फोटो आणि व्हिडिओ तो सोशल मिडियावर शेअर करत असतो. त्याच्या तंदुरुस्तीचे गुपित….
मिलिंद सोमणला तुम्ही अनेकदा पळताना पाहिले असेल. तो रोज जिममध्ये जात नाही किंवा रोज धावण्याचा व्यायाम करत नाही. वयाच्या 38 व्या वर्षीच त्याने जिमला जाणे बंद केले आहे. जिम फक्त शरीरसौष्ठवासाठी असते, तंदुरुस्तीसाठी नाही असे त्याचे मत आहे. त्याचे असेही म्हणणे आहे की, तो आज जितका तंदुरुस्त आहे तितका तो 20 व्या वर्षीदेखील नव्हता.
आठवड्यातील तीन ते चार दिवस सकाळी तो धावण्याचा व्यायाम करतो आणि सतत स्वतःला सक्रीय ठेवतो. रोज नियमितपणे किमान वीस मिनिटे व्यायाम करतो. जेणेकरून शरीराच्या नैसर्गिक हालचालींवर वयामुळे मर्यादा येऊ नयेत. त्याचबरोबर तो नियमित सूर्यनमस्कार घालतो. शरीर तंदुरुस्त हवे असेल तर सूर्यनमस्काराला पर्याय नाही, असे तो सांगतो.
तो दिवसाची सुरवात जवळपास अर्धा लिटर पाणी पिऊन करतो. त्यानंतर धावण्याचा व्यायाम, सूर्यनमस्कार आणि नऊ वाजण्याच्या सुमारास नाश्त्याला शेंगदाणे, पपई, टरबूज, कलिंगड अशी हंगामी फळे खातो. दुपारी दोन वाजताच्या जेवणामध्ये भात किंवा दालखिचडी, भाज्यांचा समावेश असतो. भातावर तो दोन चमचे तूप घेतो. त्याखेरीज भाजीबरोबर ते चार ते पाच चपात्या खातो. महिन्यातून एकदा चिकन, मटण, अंडी असा आहार असतो.
संध्याकाळी पाच वाजता तो ब्लॅक टी पितो. तो गुळाचा बनवलेला असतो. रात्री हलक्या जेवणाला त्याची पसंती असते. एक प्लेट भाजी किंवा जास्त भूक असेल तर दालखिचडी एवढेच जेवण घेतो. रात्री तो कधीही मांसाहार करत नाही. गोड पदार्थ फक्त गुळाचेच खातो.