लॉकडाऊन हटवल्यानंतरही 10 लाख आयटी कर्मचारी घरातून काम करणार 

भारतातील माहीती तंत्रज्ञान कंपन्यावर जास्त परिणाम नाही

बंगळुरू :  देशात सध्या करोनाव्हायरसमुळे लॉक डाऊन चालू आहे. त्यामुळे बरेच आयटी कर्मचारी घरातून काम करित आहेत. लॉक डाऊन संपुष्टात आल्यानंतरही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील किमान 10 लाख कर्मचारी घरातून काम करीत राहण्याची शक्‍यता असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.

इन्फोसिस कंपनीचे सहसंस्थापक असलेले एस गोपालकृष्णन यांनी सांगितले की, लॉक डाऊननच्या काळातही आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरातून काम करू देण्याचा मार्ग निवडला. सुरूवातीच्या काही आठवड्यांमध्ये यासाठीच्या उपकरणांची जमवाजमव करण्यात वेळ गेला. मात्र नंतर बहुतांश आयटी कंपन्यांचे काम व्यवस्थित चालू आहे.

आगामी काळातही आपल्या ग्राहकांची परवानगी घेऊन माहिती तंत्रज्ञान कंपन्या शक्‍य तितक्‍या जास्त कर्मचाऱ्यांकडून घरातून काम करून घेण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे स्वरूप आमूलाग्र बदलण्याची शक्‍यता आहे. खरे म्हणजे बऱ्याच प्रमाणात या शक्‍यतेवर माहिती तंत्रज्ञान कंपन्या अगोदरच विचार करीत होत्या. मात्र लॉक डाऊननंतर ही प्रक्रिया अधिक वेगाने सुरू झाली.

सध्या मोठ्या माहिती-तंत्रज्ञान कंपन्यातील 90 ते 95 टक्के लोक घरातून काम करतात. आतापर्यंत या कंपन्यांच्या कामकाजावर फारच नकारात्मक परिणाम झालेला नाही. अशा पद्धतीने आगामी काळातही काम करण्यास काय हरकत आहे असा विचार माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे संचालक करीत आहेत. लॉक डाऊननंतर बऱ्याच उद्योगांचे स्वरूप बदलणार आहे. ऑफिससाठीची खर्चिक जागा घेण्याची गरज आहे का, यावर माहिती तंत्रज्ञान कंपन्याच नाहीतर स्टार्ट अपही विचार करीत आहेत. स्टार्ट अपचे काम सध्याच्या परिस्थितीत घरातून चालू आहे.

त्यामुळे माहिती तंत्रज्ञानावर आधारित बरेच उद्योग आपला काही भाग कर्मचाऱ्यांना घरातून करून देण्याची शक्‍यता असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, लॉकडाऊननंतर माहिती तंत्रज्ञान कंपन्यातील 20 ते 30 टक्के लोक घरातून काम करतील. हा आकडा साधारणपणे 10 लाख इतका आहे. भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सध्या साधारणपणे 40 लाख लोक काम करीत आहेत.

लॉक डाऊननंतर भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रावर मोठा नकारात्मक परिणाम होण्याची शक्‍यता कमी आहे. किंबहुना काही माहिती तंत्रज्ञान कंपन्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर काम करू शकणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या विचारात आहेत. पहिले 2 महिने या कंपन्यांच्या व्यवस्थापनाला महसुलातील तुटीमुळे त्रास होईल. मात्र नंतर सर्वकाही सुरळीत होईल असे त्यांनी सांगितले.

एस गोपालकृष्णन,

सहसंस्थापक, इन्फोसीस

…………

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.