पिंपरी – विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होणार असल्याने डिसेंबरला गुणवंत विद्यार्थ्यांना दिली जाणारी बक्षिसाची रक्कम आचारसंहितेपूर्वीच विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केली आहेत. महापालिका क्षेत्रातील 1192 विद्यार्थ्यांना 1 कोटी 48 लाखांची बक्षीसे दिली आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महापालिका क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीसे दिली जातात. 80 टक्याहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना दहा हजार तर 90 टक्क्याहून अधिक गुण मिळविणाऱ्या दहावीतील विद्यार्थ्यांना पंधरा हजार रूपये बक्षीस दिले जाते. तसेच बारावीत ऐंशी टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना पंधरा हजार रूपयांचे बक्षीस दिले जाते.
यासाठी महापालिकेकडे 4500 अर्ज आले होते.
अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 25 सप्टेंबर आहे. दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि रक्कमेचे वाटप हे पवनाथडी जत्रेत होत असते. हा कार्यक्रम नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात होत असतो. मात्र, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्यापूर्वीच त्यापैकी पहिल्या टप्प्यात 1192 विद्यार्थ्यांना बक्षीसाची रक्कम खात्यात जमा केली आहे. तसेच महापालिका शाळांत शिकणाऱ्या 89 विद्यार्थ्यांना बक्षीसे दिली आहेत. त्यात तीन लखपती मुलांसह 80 टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्यांना 25 हजार, 85 टक्क्याहून अधिक गुण मिळविणाऱ्यांना पन्नास हजार, तर नव्वद टक्क्याहून अधिक गुण मिळविणाऱ्यांना एक लाखांचे बक्षीस दिले जाते. तसेच अंध शाळेतील दहावीच्या मुलांना प्रत्येक पन्नास हजार रूपयांचे बक्षीस दिले जाते. महापालिका शाळांतील 89 विद्यार्थ्यांना सुमारे 30 लाख 75 हजारांची बक्षीसे लाभार्थींच्या खात्यात जमा
केली आहेत.
महापालिकेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस दिले जाते. अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार आलेल्या अर्जांपैकी अकराशे अर्जांची छाननी पहिल्या टप्प्यात झाली. आचारसंहितेचा अडसर ठरू नये, म्हणून आज लाभार्थ्यांच्या खात्यात बक्षिसाची रक्कम जमा केली आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यातील बक्षिसांची रक्कम लवकरच लाभार्थींना देण्यात येईल.
– विलास मडिगेरी, अध्यक्ष, स्थायी समिती, महापालिका.