नगरपरिषदेच्या प्रभागांना विकासाची प्रतीक्षा

जामखेड शहरातील स्थिती ः नगरपरिषद होऊन चार वर्षं उलटूनही सुविधांची वानवा

नागरिकांना मिळते दूषित पाणी

तालुक्‍यात अद्यापही चांगला पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शहराला महिन्यातून एकदा पाणीपुरवठा होत आहे. मात्र विंचरणा नदीपात्रात शहरातील सांडपाणी सोडले जात असल्याने नळाद्वारे येणारे पाणी दूषित होत आहे. त्यामुळे नगरपालिकेने याकडे लक्ष देऊन शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

जामखेड  – जामखेडला नगरपालिका झाल्यानंतर किमान सर्वच प्रभागांत समान निधी खर्च होण्याची अपेक्षा नागरिकांची होती. मात्र नगरपरिषद अस्तित्वात येऊन चार वर्षांचा कालावधी उलटूनही अद्यापही काही प्रभागांत एकही काम झालेले नाही. हे कोणाच्या सांगण्यावरून होत आहे, असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.

चार वर्षांपूर्वी जामखेडला नगरपालिका झाली. नगरपरिषदेला आलेल्या निधीचे सर्व प्रभागांत समप्रमाणात वाटप गेले पाहिजे होते. परंतु जामखेड शहरातील बहुतांश भागांत अद्याप एकही काम झाले नाही. शहरातील सदाफुलेनगर, टेकाळेनगर, इनामपट्टा, ख्वाजानगर, फुलमळा, खंडोबावस्ती, आहिल्यानगर, म्हेत्रेवस्ती, खडकवाडी, घायतडकवस्ती, आदी भागांत एकही काम झाले नाही. या भागात अद्यापपर्यंत बऱ्याच ठिकाणी रस्ते नाहीत, बंदिस्त गटारी नाही, इनामपट्टा भागात अद्याप पाणीपुरवठा करणारी नळ योजना नाही. नवीन ठिकाणी विजेचे खांबही नाहीत.

काझीवाडी तलावा शेजारी जामखेड नगरपरिषदेची पाणीपुरवठा विहीर असून, त्याद्वारे सदाफुलेनगर, काटकरवस्ती, पोकळेवस्ती, टेकाळेनगर, अहिल्यानगर, म्हेत्रेवस्ती, खंडोबावस्ती परिसराला पाणीपुरवठा केला जातो. सदर विहिरीची खोली कमी आहे. त्यामुळे तिची खोली वाढविण्याची गरज आहे. तसेच इनामपट्टा व सदाफुलेनगर भागाला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जीर्ण झाली आहे. त्यामुळे ती बदलण्यात यावी, अशी मागणी होत आहे. सदाफुलेनगर, टेकाळेनगर, अहिल्यानगर, म्हेत्रेवस्ती, खंडोबावस्ती, प्रभाकरनगर, घायतडकवस्ती, पोकळेवस्ती, काटकरवस्ती, इनामपट्टा, ख्वाजानगर, फुलमळा, पारधीवस्ती, खडकवाडी आदी भाग रस्ते, गटारी व पाणी या मूलभूत सोयींपासून वंचित आहे.

नगरपरिषदेचे घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना तलाठ्याचा उतारा आणण्याची सक्ती करण्यात येत आहे. ती करू नये. शहरातील व इतर वाड्या-वस्त्यांवरील ज्यांनी ग्रामपंचायत उताऱ्यावर खरेदी खत करून घेतले आहे. त्यामुळे आता या जागांवर कोणत्याही योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे सदर चुकीच्या नोंदी करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी आणि संबंधित नागरिकांच्या जागांच्या नोंदी नगरपरिषदेने लावाव्यात.

जामखेड नगरपरिषद हद्दीतील मागासवर्गीय, अंध, अपंग, महिला, वृद्ध, शेतकरी, इतर समाजातील विविध घटकांतील लोकांना वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ मिळाला. सदाफुलेनगर परिसरातील स्मशानभूमी जीर्ण अवस्थेत आहे. तेथे सुशोभीकरण करण्यात यावे. सदाफुलेनगर परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे. डीपी प्लॅन मंजूर करून सर्व मालमत्ताधारकांचे सर्वेक्षण होऊन त्यांना उतारे देण्यात यावेत. शासकीय मोकळ्या भूखंडांची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

नगरपालिकेने तातडीने यावर निर्णय न घेतल्यास नासिर सय्यद, श्‍याम जमदाडे, जिलानी शेख, राहुल टेकाळे, बाशद शेख, आमीर शेख, प्रशांत घोडेस्वार, इरफान शेख, शकील पठाण, परवेझ शेख, इस्माईल शेख, जाकीर सय्यद, अफसर शेख, मौसीज सय्यद, अजय अवसरे, कय्यूम शेख, असीर बागवान यांच्यासह नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.