नवी दिल्ली – ई -रुपी या प्री- पेड ई- व्हाऊचर सेवेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सोमवारी करण्यात आली. ई-रुपी हे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)ने विकसित केलेले प्रीपेड ई-व्हाउचर आहे. ई-रुपी हे डिजिटल पेमेंटचे कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस माध्यम आहे. सुरुवातीला आरोग्य क्षेत्रात याचा वापर होणार आसून नंतर इतर क्षेत्रात त्याचा वापर होणार आहे. यामुळे सरकारने किंवा इतरानी दिलेले पैसे फक्त संबंबधीत कामासाठी वापरले जातील.
ई- रुपी हे डिजिटल पेमेंटचे कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस साधन आहे. हे एक क्यूआर कोड किंवा एसएमएस स्ट्रिंग-आधारित ई-व्हाउचर आहे, जे लाभार्थ्यांच्या मोबाइलवर वितरित केले जाते. या वन टाईम पेमेंट यंत्रणेचे वापरकर्ते कार्ड, डिजिटल पेमेंट ऍप किंवा इंटरनेट बॅंकिंग प्रवेशाशिवाय सर्व्हिस प्रोव्हाडर व्हाउचर रिडीम करू शकतील.
यामुळे व्यवहार पूर्ण झाल्यानंतरच सर्व्हिस प्रोव्हाडरला पैसे दिले जातील. प्री-पेड असल्याने, सेवा पुरवणाऱ्याला कोणत्याही मध्यस्थांच्या सहभागाशिवाय वेळेवर पैसे देण्याचे आश्वासन ई-रुपी देते. वेलफेअर सर्व्हिसचे लीक-प्रूफ वितरण सुनिश्चित करण्याच्या दिशेने पाऊल असणार आहे.
आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, खत अनुदान, इत्यादी योजनांअंतर्गत सेवा पुरवण्यासाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो. खाजगी क्षेत्र देखील आपल्या कर्मचारी कल्याण आणि कॉर्पोरेट कार्यक्रमांचा भाग म्हणून या डिजिटल व्हाउचरचा लाभ घेऊ शकते.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आपल्या युपीआय प्लॅटफॉर्मवर वित्तीय सेवा विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांच्या सहकार्याने विकसित केले आहे. ई-आरयूपीआय सेवेचे प्रायोजक लाभार्थी आणि सेवा प्रदात्याशी कोणत्याही भौतिक इंटरफेसशिवाय डिजिटल पद्धतीने जोडते.