मांजरी, दि. 12 (प्रतिनिधी) -मांजरी बुद्रुक येथील सिमेंट कॉंक्रीट रस्त्याच्या कामातील धोका व असुरक्षितता निदर्शनास आणूनही पीएमआरडीए अधिकारी व ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे रविवारी झालेल्या पावसात येथे अनेक अपघात झाले. आज, दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी पाणी तसचे साचून होते. अनेक वाहने अडकून पडल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले.
पीएमआरडीएकडून मांजरी बुद्रुक रस्त्याचे रूंदीकरण व कॉंक्रीटीकरणचे काम केले जात आहे. हे काम करताना वाहतूक सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली गेलेली नाही. कोठेही सिग्नल, रिफ्लेक्टर, फलक लावलेले नाहीत. काही दिवसांपूर्वी अपघातात याच निष्काळजीपणामुळे एका तरुणाचा बळी गेला आहे. रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने या कामातील त्रुटी उघड झाल्या. आजही अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचून राहिल्याने त्यात वाहने बंद पडत होती. गेल्या दोन दिवसांत अनेक दुचाकी, रिक्षा तसेच काही चारचाकी वाहने बंद पडून मोठे नुकसान झाले.
या रस्त्याचे काम करीत असताना पीएमआरडीएचे अधिकारी आणि ठेकेदारांनी सुरक्षितेबाबत दुर्लक्ष केल्याचा फटका पावसात अनेक वाहन चालकांसह नागरिकांना बसला. त्यामुळे संबंधीतांना यास जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल दाखल करण्यात यावेत, अशी मागणी आम आदमी पार्टीचे राजेंद्र साळवे, यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठानचे हवेली तालुका अध्यक्ष अशोक आव्हाळे, तंटामुक्त समितीचे हवेली तालुका माजी अध्यक्ष विकास गायकवाड पाटील यांनी केली आहे.