हडपसर, दि. 12 (प्रतिनिधी) -हडपसर भाजी मंडईत गेली अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांचा अभाव आहे. अनेक समस्या आहेत त्यातील प्रामुख्याने पावसाळी गटारे चांगल्या स्थितीत नसल्याने पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी, विक्रेत्यांच्या मालाचे नुकसान होते आणि ग्राहकांना चालणेही अवघड होते. सुरक्षेचा प्रश्न, शेडचे गळणारे पत्रे, पिण्याच्या पाण्याची समस्या अशा अनेक समस्यांच्या गर्तेत हडपसर भाजी मंडई आहे.
शिवसेनेचे उपविभागप्रमुख महेंद्र बनकर म्हणाले की, मी गेली चार वर्षांत भाजी मार्केट मधील समस्या संदर्भात पुणे महापालिकेला अनेक पत्र दिले, समस्यांना वाचा फोडली परंतु, आजपर्यंत समस्यांचे निराकरण झालेले नाही अनेक दिवस पाठपुरावा केला. परंतु, पावसामुळे मार्केटमधील विक्रेत्यांचे अतोनात हाल झाले. हजारो रुपयांच्या मालाचे नुकसान झाले म्हणून मी माननीय उपायुक्त माधव जगताप यांना फोन केला आणि परिस्थितीची माहिती दिली. आज दुपारी मंडई अधिकारी मंद्रूपकर तसेच अभियंते भागवत यांनी हडपसर भाजी मार्केटची प्रत्यक्ष पाहणी केली. येत्या दहा ते पंधरा दिवसांत प्रत्यक्ष काम सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी विक्रेते सचिन शेवाळे, मयुर फडतरे, अशोक भोसले, फिरोज भाई, दिलीप गायकवाड उपस्थित होते.