कार्ला, (वार्ताहर) – आई एकविरा देवी मंदिर पायथ्याशी असणाऱ्या वेहेरगाव गावात ग्रामदैवत भैरवनाथ व महादेव देवस्थानच्या वर्धापन दिनानिमित्त मागील चार दिवसांपासून सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली.
या वेळी हभप पांडुरंग महाराज साळुंखे यांचे काल्याच्या कीर्तन झाले. दहीदुधाच्या काल्याचा प्रसाद वाटप करण्यात आला. मागील चार दिवसात सप्ताहामध्ये हभप सिध्दी लष्करे, हभप घनश्याम महाराज पडवळ, हभप सारिका पवार, हभप अंकुश महाराज वाघिरे यांची प्रवचनरुपी सेवा तर हभप सागर महाराज पडवळ, हभप शुभम महाराज देशमुख, हभप ज्ञानेश्वरी वायभट, हभप साध्वी वैष्णवदैवी सरस्वती यांची कीर्तनरुपी सेवा पार पडली. सप्ताहाचे काळात दररोज काकड आरती, हरिपाठ, हरिजागर व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
सप्ताह सांगता झाल्यानंतर भैरवनाथ देवाची पालखी व हारांची मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये समस्थ ग्रामस्थ हरिनामाच्या जयघोषाने तल्लीन होऊन आनंदी सहभागी झाले होते. वेहेरगाव ग्रामस्थांच्या वतीने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.