पिंपरी,(प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या गरजा ओळखून महापालिका विविध उपक्रम किंवा विकासकामांचे नियोजन आखत असते. या विकासकामांसाठी विविध अनुभवी तज्ञांची, अत्याधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. शहराची व्यापकता आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता नागरिकांना जास्तीत जास्त पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सी.एस.आर उपक्रमातंर्गत अधिकाधिक कंपन्यांमधील अनुभवी प्रतिनिधींचे मार्गदर्शन आणि मनुष्यबळ महापालिकेस हवे आहे, असे मत आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सी.एस.आर कक्ष अंतर्गत महापालिका कार्यक्षेत्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय 40 कंपन्या तसेच विविध उद्योग समुह प्रतिनिधींची बैठक चिंचवड येथे आयोजित करण्यात आली होती.. त्यावेळी आयुक्त सिंह बोलत होते.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, मुख्य लेखापरीक्षक प्रमोद भोसले, उप आयुक्त अजय चारठाणकर, विविध 40 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे सी.एस.आर सेलचे प्रतिनिधी आणि कर्मचारी उपस्थित होते.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, महापालिकेच्या वतीने सी.एस.आर. निधीमधून मोरवाडी येथे उभारण्यात आलेले दिव्यांग भवन हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. शहरातील दिव्यांग बांधवांसाठी सर्व सोयी सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात यासाठी सुविधा असलेले पिंपरी चिंचवडमधील दिव्यांग कल्याणकारी केंद्र कदाचित देशातील एकमेव केंद्र असेल. या केंद्रामध्ये दिव्यांग बांधवांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयीसुविधा तसेच उपचार थेरपीसाठीची अत्याधुनिक उत्तम दर्जाची उपकरणे खरेदी करण्यामध्ये सी.एस.आर चा मोठा वाटा आहे. भविष्यात महापालिकेच्या वतीने विविध कल्याणकारी प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यासाठी शहरातील विविध कंपन्यांमधील प्रतिनिधींच्या अनुभवाची गरज असल्याचेही आयुक्त सिंह यावेळी म्हणाले.
अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे म्हणाले, विकासकामांमध्ये नाविन्यपुर्ण कल्पना, अत्याधुनिक यंत्रणा तसेच अनुभवाची गरज असते. शहरातील कंपन्यांकडे तो अनुभव आहे आणि याच अनुभवाच्या मदतीने शहरात दीर्घकालीन सकारात्मक बदल घडविण्यास मदत मिळू शकते.
यावेळी सी.एस.आर सेलच्या सल्लागार श्रुतिका मुंगी यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये महापालिकेस जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवर मिळालेल्या सन्मानांची तसेच सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकासकामांची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ऋतुजा करकरे यांनी केले. निळकंठ पोमण यांनी आभार मानले.
योगदानाविषयी चर्चा
या कार्यक्रमात कंपन्यांचे प्रतिनिधी यांनी येत्या काळात सी.एस.आर मार्फत राबविल्या जाणार्या उपक्रमाअंतर्गत कशा पद्धतीने योगदान केले जाऊ शकते याबाबत सखोल चर्चा केली. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महापालिका सी.एस.आर अंतर्गत सामाजिक उपक्रम राबविण्याची तयारी दाखविली.