पुणे (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्ह्यात 747 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचपदाची निवड 9 व 10 फेब्रुवारीला होणार आहे. या निवडणुकांचा धुरळा अद्याप खाली बसला नसताना राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील 75 ग्रामपंचायती, दोन नगरपरिषदा व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील तीन जागांच्या पोटनिवडणुकीची तयारी केली आहे. यासाठी प्रारुप मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
गेली वर्षभर करोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणूक घेण्यावर बंधने आली. कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायती, नगरपरिषदांवर प्रशासक नेमण्यात आले. करोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर केंद्रिय निवडणूक आयोगाने बिहारची निवडणूक घेतली. यानंतर राज्य निवडणूक आयोगानेही राज्यातील निवडणुका सुरक्षित वातावरणात घेण्याबाबत चाचपणी केली. त्यानुसार ग्रामपंचायत निवडणुका नुकत्याच पार पडल्या. जानेवारी ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या पुणे जिल्ह्यातील 747 ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश होता.
आता जानेवारी ते डिसेंबर 2021पर्यंत मुदत संपणाऱ्या 58 आणि नव्याने स्थापन झालेल्या 17 अशा जिल्ह्यातील एकूण 75 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम होऊ घातला आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींची प्रभागरचना व आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. याचबरोबर जिल्ह्यातील चाकण व राजगुरूनगर या नगरपरिषदांचीही मुदत संपलेली असताना दोन्ही नगरपरिषदांवर प्रशासकराज आहे.
येथेही 15फेब्रुवारीला प्रारुप मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. यावर 22 फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात येतील व अंतिम मतदारयादी 1 मार्च रोजी प्रसिद्ध होईल, तर 8 मार्च रोजी मतदान केंद्रांची यादी आणि केंद्रनिहाय मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या जातील. तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील तीन नगरसेवकांचे करोनाकाळात निधन झाले. त्यामुळे या तीन रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी 16 फेब्रुवारीला प्रारुप मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
यावर 23 फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात येतील. त्यानंतर 3 मार्च रोजी अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या जातील, तर 8 मार्च रोजी मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध केल्यानंतर 12 मार्च रोजी मतदान केंद्रनिहाय मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या जातील. हा कार्यक्रम जाहीर झाल्याने निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांनी आतापासूनच दंड थोपटायला सुरुवात केली आहे.
ग्रामपंचायतीसाठी वेळापत्रक
8 फेब्रुवारी- तहसीलदारांच्या वतीने प्रत्येक गावाचे गुगल मॅप नकाशे अंतिम केले जाणार.
11 फेब्रुवारीपर्यंत- तलाठी व ग्रामसेवक स्थळ पाहणी करून प्रभागाच्या सीमा निश्चिती करणार तसेच, अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण निश्चित करणार.
16 फेब्रुवारी- प्रारूप प्रभाग रचनेस तहसीलदारांच्या वतीने मान्यता दिली जाणार.
22 फेब्रुवारीपर्यंत- प्रारूप प्रभाग रचनेत आवश्यकता असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दुरुस्त्या करणार.
25 फेब्रुवारीपर्यंत- प्रारूप प्रभाग रचनेच्या दुरुस्त्यांना तहसीलदारांच्या वतीने मान्यता दिली जाणार
26 फेब्रुवारी- प्रभागनिहाय आरक्षण काढण्यासाठी विशेष ग्रामसभेची सूचना काढली जाणार.
4 मार्च-विशेष ग्रामसभेत प्रभागनिहाय प्रत्यक्षात आरक्षणे काढली जाणार.
5 ते 12 मार्च- प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांना हरकती दाखल करता येणार.
15 मार्चपर्यंत- प्राप्त झालेल्या हरकती उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर केल्या जाणार.
22 मार्चपर्यंत- हरकतींवर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या वतीने सुनावणी घेतली जाणार.
25 मार्चपर्यंत- हरकतींवर अंतिम निर्णयासाठीचा प्रस्ताव अभिप्रायसह जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला जाणार.
30 मार्च-जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने प्रभाग रचनेला अंतिम स्वरूप दिले जाणार.
1 एप्रिल – जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिलेल्या प्रभाग रचनेला प्रसिद्धी दिली जाणार.
तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या
तालुका, मुदत संपलेल्या, नव्या
जुन्नर, 32,4
आंबेगाव, 15, 2
खेड, 4, 0
शिरूर, 0, 5
मावळ, 1, 0
मुळशी, 1, 0
भोर, 0, 2
हवेली, 1, 2
इंदापूर, 2, 2
बारामती, 2, 0