मिटकरींच्या दाव्यावर बजरंग सोनावणे म्हणाले,”शरद पवार साहेबांना सोडले तर पब्लिक मला मारेलच, पण बायकोही नाश्ता द्यायची नाही”

Bajrang Sonawane on Amol Mitkari । राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते अमोल मिटकरी यांनी बजरंग बाप्पा हे अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. मात्र, यावर बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. यानंतर त्यांनी “बीड जिल्ह्यातील जनतेने माझ्यावर खूप प्रेम केले आहे. पण मी शरद पवार साहेबांना सोडले तर पब्लिक मला मारेलच, पण बायकोही नाश्ता द्यायची नाही,” अशी मिश्कील टिप्पणी बजरंग सोनवणे यांनी केली.
मिटकरी पवारांच्या घरचे टेलिफोन ऑपरेटर आहेत का ? Bajrang Sonawane on Amol Mitkari ।
अमोल मिटकरींच्या दाव्यावर बजरंग सोनवणे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना सोनावणे यांनी अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. “अजित पवार यांच्या बंगल्यावर कोणाचे कॉल येतात, हे समजायला अमोल मिटकरी हे काय टेलिफोन ऑपरेटर आहेत का? कारण अजितदादांच्या बंगल्यावर कोणाचे कॉल येतात, याची माहिती त्यांच्या टेलीफोन ऑपरेटरकडेच असू शकते. कुणाला काय राजकारण करायचं ते करुद्या, त्याला काय उत्तर द्यायचं, ते मी बघेन. शरद पवारांची ताकद महाराष्ट्रच काय, तर अख्ख्या देशाने पाहिली आहे, ती पचवता येत नसल्याने संभ्रम निर्माण करण्याचं काम केलं जात आहे, असे बजरंग सोनवणे यांनी म्हटले.
पब्लिक तर मारेलच,बायको मला नाश्ता द्यायची नाही Bajrang Sonawane on Amol Mitkari ।
शरद पवार साहेबांचे आठ खासदार राज्यभरात निवडून आले आहेत. माझ्यासारखा एखादा आमदार इतर कोणाच्या संपर्कात गेला तर त्याला पब्लिक तर मारेलच… घरात माझे वडील मारतील, माझी बायको मला नाश्ता द्यायची नाही, उलट ज्यांचा एखादा खासदार आहे, त्यांना शरद पवारांच्या संपर्कात येता येईल. यांच्यावर काय बोलायचं, असे सोनवणे यांनी म्हटले. अमोल मिटकरी हे काही दिग्गज नाव नाही. त्याने ट्वीट करावं आणि मी दखल घ्यावी… दखलपात्र माणसाची दखल घेतली जाते, असा टोलाही बजरंग सोनवणे यांनी लगावला.





