यांत्रिकीकरणाद्वारे सफाईच्या निविदेविरोधात स्वयंरोजगार संस्था आक्रमक
पिंपरी : महापालिकेमध्ये सर्वच कारभार उलटसुलट सुरू आहे. ठेकेदारांना पोसण्यासाठी सर्व निविदा काढल्या जात आहेत. विकासकामांशी किंवा नागरिकांशी आयुक्त व सत्ताधारी पक्ष यांना काहीच देणे घेणे राहिलेले नाही. केवळ ठेकेदार पोसण्यासाठी यांत्रिकी पद्धतीने रस्ते सफाईची निविदा काढण्यात आली आहे.
महापालिकेचा कारभार म्हणजे एक प्रकारची “चांडाळ चौकडी’ झाली आहे. ही निविदा रद्द करण्याच्या मागणीसाठी शहरातील सफाई कामगारांच्या वतीने कामबंद आंदोलन करण्यात येणार असून त्याची अंमलबजावणी येत्या दोन दिवसांत केली जाणार आहे, असे प्रतिपादन शिवसेनेच्या महिला संघटिका सुलभा उबाळे यांनी केले. कामबंद आंदोलनात 68 स्वयंरोजगार संस्था व 1800 कामगार सहभागी होणार आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने यांत्रिकी पद्धतीने रस्ते सफाई करण्यासाठी निविदा राबविण्यात आली आहे. यामुळे शहरातील सुमारे अकराशे सफाई कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. यासंदर्भात आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या दालनामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती.