पिरंगुट – घोटावडेफाटा (ता. मुळशी) येथील एका किराणा मालाच्या दुकानाल सोमवारी (दि. 24) पहाटे चारच्या सुमारास आग लागली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पौड पोलीस स्टेशन आणि मारुंजी येथील अग्निशमन दलांनी योग्यवेळी आग आटोक्यात आणली.
घोटावडेफाटा (ता. मुळशी) येथील चौकात पुण्याच्या दिशेला जाताना डाव्या बाजूला बालाजी किराणा स्टोअर नावाचे दुकान आहे. आज पहाटे चारच्या सुमारास या दुकानाला अचानक मोठी आग लागली. या घटनेची माहिती पौड पोलिसांना मिळाली. पोलीस शिपाई महेश पवार आणि पोलीस नाईक तडवी यांनी ही माहिती वरिष्ठांना दिली.
पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे, सहायक फौजदार शितोळे, चालक हगवणे हे त्वरित घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तत्काळ मारुंजी येथील अग्निशमन केंद्राला ही माहिती दिली आणि अग्निशमन दलाने ही आग त्वरित आटोक्यात आणली. पौड पोलीस आणि मारुंजी अग्निशमन दलाने तत्परता दाखवल्याने आग शमली, त्यामुळे मोठी वित्तहानीही टळली आहे. याबरोबरच आजूबाजूच्या दहा ते पंधरा दुकानांचे नुकसानही टाळले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असल्याचा अंदाज आहे.