मुंबई : जादूटोणा विरोधी कायदा प्रचार व प्रसार अंमलबजावणी समितीने कामकाजाला गती देऊन राज्यात जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
मंत्रालयातील उपमुख्यमंत्री यांच्या समिती कक्षात “जादूटोणा विरोधी कायदा’ प्रभावीपणे राबविण्याबाबत बैठक पार पडली.या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांनी प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत 2013 मध्ये हा कायदा करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य आहे.
राज्यात “जादूटोणा विरोधी कायद्याची’ प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. आजही अंधश्रद्धेमुळे अनेक गरीब, असहाय्य लोकांची फसवणूक होत असते अशा लोकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे, जादूटोणा विरोधी कायदा प्रचार व प्रसार अंमलबजावणी समिती करण्याबाबत सामाजिक न्याय विभागाने कार्यवाही करावी.
गृह विभागाने आलेल्या तक्रारींवर योग्य ती कार्यवाही करावी. प्रा. श्याम मानव यांनी केलेल्या सूचनांबाबत शासन सकारात्मक असून राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून सर्व निर्णय घेण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
जादूटोणा विरोधी कायद्याच्या समित्यांचे पुनर्गठन लवकरच करणार
जादूटोणा विरोधी कायदा प्रचार व प्रसार अंमलबजावणी समितीचे पुनर्गठन करण्यात येईल. या कायद्याची माहिती तसेच जनजागृती करणे तसेच जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार व प्रसार समितीचे सहअध्यक्ष प्रा. श्याम मानव यांच्याशी चर्चा करून त्यांनी विभागासंदर्भात मांडलेल्या मुद्द्यांबाबत कार्यवाही करण्याची ग्वाही यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.