मुंबई- मुंबईतील इंडियाबुल्स फायनान्स सेंटरच्या काही कार्यालयांवर अंमलबजावणी संचलनालय (ईडी)ने छापेमारी केली आहे. ही कारवाई ईडी दिल्ली आणि मुंबई यांच्या संयुक्त मोहिमेतून करण्यात आली आहे. सदर छापेमारी पीएमएलए कायदा 2002 अंतर्गत सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडियाबुल्स हाऊसिंगचे प्रमोटर समीर गेहलोत यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या निमित्ताने ही कारवाई सुरू आहे. याआधीच्या 2014 आणि 2020मध्ये झालेल्या पैशांच्या हेराफेरीच्या प्रकरणातील गुन्ह्यांच्या अहवालावर आधारीत ही छापेमारी सुरू आहे.
हेराफेरी आणि ऑडिटमधील अनियमिततेच्या प्रकरणात इंडियाबुल्स समूहाच्या कंपन्यांच्या विरोधात एप्रिल 2021 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्सच्या कंपनीचाही समावेश आहे. दिल्ली आणि मुंबईच्या ईडीच्या टीमने संयुक्त अशा पद्धतीने या प्रकरणात छापेमारी केली आहे.
दरम्यान, ईडीने आणि एनआयएने गेल्याच आठवड्यात मुंबईत दहा ठिकाणी छापे मारले होते. त्यामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मालमत्तांच्या ठिकाणी कारवाई झाली होती. दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकरच्या घरी ईडीच्या पथकाने छापा टाकला होता. मनी लॉंड्रिंग प्रकरणात ही छापेमारी झाली होती. त्यामध्ये काही राजकीय नेत्यांचेही कनेक्शन असल्याचे बोलले जात आहे.