पिंपरी, दि. 27 – पिंपरीतील उद्योजक आणि माजी उपमहापौर अमर मूलचंदानी यांच्या घरावर सक्तवसुली संचालनालय (ईडी)च्या पथकाने शुक्रवारी (दि. 27) छापा मारला. शुक्रवारी सकाळपासून पिंपरी पोलिसांनी मूलचंदानी यांच्या घरासमोर बंदोबस्त लावला आहे.अमर मुलचंदानी हे सेवा विकास बॅंकेचे चेअरमन होते. त्यांच्या कार्यकाळात शेकडो कोटी रुपयांचे बोगस कर्जवाटप झाले असल्याचा आरोप आहे. या संदर्भाने पिंपरी पोलीस ठाण्यात विविध गुन्हे देखील झाले आहेत. मार्च 2021 मध्ये मूलचंदानी यांना अटक देखील झाली. बनावट कागदपत्रे बनवून त्या आधारे बॅंकेतून कोट्यवधी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आल्याबाबत गुन्हे दाखल आहेत.
ऑगस्ट 2021 मध्ये तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषद घेत दि सेवा विकास को ऑप बॅंकेचे तत्कालीन चेअरमन, संचालक मंडळ आणि बॅंक अधिका-यांनी केलेल्या बोगस कर्ज वाटपामध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत माहिती दिली होती. तब्बल 429.57 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे त्यावेळी सांगण्यात आले. बॅंकेचे तत्कालीन चेअरमन, संचालक मंडळ, बॅंकेचे अधिकारी, कर्मचारी आणि कर्जदार यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले. सहकारी संस्थेकडून दि सेवा विकास को ऑप बॅंकेचे लेखापरीक्षण करण्यात आले. त्यात बॅंकेची 50 लाख रुपये रकमेपेक्षा अधिक रकमेची 204 कर्ज प्रकरणे तपासण्यात आली. त्यातील 124 कर्ज प्रकरणांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले. 124 कर्ज प्रकरणांबाबत कर्ज मंजुरीपूर्व व पश्चात एकूण 429.57 कोटी रुपयांचा गैरव्यवहार, अपहार, फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. या लेखपरीक्षणाचा अहवाल 6 ऑगस्ट 2021 रोजी सादर करण्यात आला होता. मागील वर्षभरात उसंत मिळाल्यानंतर पुन्हा कारवाई सुरू झाली असल्याचे म्हटले जाते. ईडीच्या पथकाने शुक्रवारी मुलचंदानी यांच्या घरावर छापा मारल्याची सूत्रांची माहिती आहे.
कारवाई बाबत कमालीची गुप्तता
दि सेवा विकास को ऑप बॅंकेतील घोटाळा प्रकरणी अमर मुलचंदानी यांच्या घरावर छापा मारल्याचे सांगण्यात येत असले तरी या कारवाईबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. ईडीने नेमकी काय कारवाई केली, कोणती कागदपत्रे ताब्यात घेतली अथवा इतर माहिती आतापर्यंत समोर आलेली नाही. ईडीने मागितल्याप्रमाणे बंदोबस्त पुरविला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.