न्यूयॉर्क – अमेरिकेतील बलाढ्य बॅंक असलेल्या गोल्डमन सॅक्स या बॅंकेने जारी केलेल्या अभ्यासावालानुसार भारतीय आर्थिक परिस्थिती उत्तम होणार असल्यामुळे भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक वाढण्याची शक्यता व्यक्त आहे.असे असताना चीनबाबत मात्र या बॅंकेने नकारात्मक चित्र रंगविले आहे. जागतिक गुंतवणूकदार या बॅंकेच्या अहवालाच्या आधारावर बरीच गुंतवणूक करतात. मात्र अमेरिकेतील व्याजदर जास्त असल्यामुळे अगोदरच परकीय गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून गुंतवणूक काढून घेत असतानाच या अहवालामुळे कधी आणि किती परकीय गुंतवणूक भारतात होईल याबाबत शंका निर्माण झाल्या आहेत.
या संस्थेने भारताबाबत म्हटले आहे की, दोन वर्षे भारतीय शेअर बाजाराची परिस्थिती सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. कारण भारताने आर्थिक सुधारणा करण्याबरोबरच पायाभूत सुविधा क्षेत्रात बराच विकास केला आहे. भारतीय गुंतवणूकदारांची बचत शेअर बाजारात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय परिस्थिती खराब असली तरी भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक सध्या बऱ्याच उच्च पातळीवर आहेत.
मात्र चीनमधील परिस्थिती वेगाने नकारात्मक होत आहे. चीनमधील अंतर्गत बचत शेअर बाजारात कमी जात आहे. जागतिक गुंतवणूकदारांचा चीन वरील विश्वास कमी होत आहे. अशा परिस्थितीत या वर्षात या बॅंकेने अनेक वेळा चीनमधील निर्देशांक कमी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. चीनमधील रिऍल्टी क्षेत्रात बरेच पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. चीनवरील कर्जाचा बोजा वाढला आहे. असे असताना चीनने शेजारी देशाबरोबर राजकीय मतभेद वाढविल्यामुळे तेथील अर्थव्यवस्थेबाबत आशादायक चित्र निर्माण होत नाही.
आशिया खंडातील इतर सर्व देशापेक्षा भारताची परिस्थिती चांगली आहे. त्यामुळे मध्यम ते दीर्घ पल्ल्यात भारतात केलेली गुंतवणूक अधिक परतावा देऊ शकेल असे या बॅंकेने सुचित केले आहे. भारत सरकारने मेक इन इंडिया मोहीम सुरू केली आहे. भारतीयांचा स्वतःच्या देशावरील अर्थव्यवस्था विश्वास वाढत आहे. या कारणामुळे भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक वाढत आहेत. आगामी काळातही ते कमी अधिक प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
निर्देशांकात घट
सोमवारी बाजार बंद होताना, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 325 अंकांनी घसरला, आणि 64 हजार 933 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 82 अंकांची कमी होत 19 हजार 443 अंकांवर बंद झाला.