मंचर – आंबेगाव, जुन्नर तालुक्यांतील मंचर, नारायणगाव, आळेफाटा परिसरातील शासकीय, निमशासकीय कार्यालय, बॅंक, पतसंस्था, सोसायट्यांचे आर्थिक व्यवहार सुरू करावेत, असे आदेश मंचर विभागाचे प्रांत अधिकारी संजय तेली यांनी बुधवारी (दि. 15) सायंकाळी दिले आहेत. सध्या शेतकऱ्यांना खरीप हंगामातील बी-बियाणे आणि खते औषधासाठी पैशांची अडचण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
मागील अनेक दिवसांपासून आंबेगाव तालुक्याचे मुख्य बाजारपेठ असलेले मंचर तसेच जुन्नर तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ असलेले नारायणगाव, आळेफाटा परिसर करोना प्रादुर्भावामुळे प्रशासनाच्या वतीने बंद ठेवण्यात आला होता;परंतु या बंदच्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांची मोठी आर्थिक अडचण होत होती. सध्या खरीप हंगामातील पिकांची अनेक कामे सुरू आहेत. ही कामे करत असताना बियाणे, खते, औषधे, मजुरी यांच्यासाठी, तसेच शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे.
शेतकऱ्यांना बॅंका, पतसंस्थांमधून पैसे काढावे लागतात; परंतु मागील काही दिवसांपासून करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बॅंका, पतसंस्था व वित्तीय संस्था बंद असल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण होत होती. यावर उपाय म्हणून प्रांत अधिकारी संजय तेली यांनी पतसंस्था, बॅंका, सोसायट्या खबरदारीच्या उपाययोजना करून सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
मंचर शहरातील बॅंका, पतसंस्थांचे काम सुरू
मंचर शहरातील बॅंका, पतसंस्थांचे कामकाज गुरुवार (दि. 16) पासुन सुरू झाले असून, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. बॅंका, पतसंस्था आठ दिवसांनी उघडल्याने व्यवहार करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. मंचर शहरात करोनाचे 26 रुग्ण वाढल्याने प्रशासनाने खबरदारीची उपाययोजना म्हणून बुधवार (दि. 8) पासून बॅंका, पतसंस्था बंद ठेवल्या होत्या. सद्यःस्थितीत खरीप हंगामातील बि-बियाणे, खते खरेदीसाठी, तसेच भांडवलासाठी पैशाची आवश्यकता शेतकऱ्यांना होती.
शेतकऱ्यांची ही गैरसोय दूर करून बॅंका,पतसंस्था सुरू कराव्यात, अशी मागणी पुणे जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे संचालक आणि मंचर येथील संत ज्ञानेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष यतीनकुमार हुले यांनी कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली होती. त्यानुसार मंत्री वळसे पाटील यांनी करोनाबाबतच्या नियमांचे पालन करून प्रशासनास बॅंका, पतसंस्था सुरू करण्याचे निर्देश दिले.