दोनशे रुपये किलोपर्यंत चढ्या दराने विक्री
पिंपरी (प्रतिनिधी) – लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी शनिवारी (दि. 26) पावसाने न भिजलेल्या टवटवीत झेंडूला चांगलाच बाजारभाव मिळाला. चक्क 160 ते 200 रुपये किलो दराने हा झेंडू विकला गेला. त्याऊलट पावसात भिजलेला झेंडू 60 रुपयांपासून 100 रुपये किलोपर्यंत विकला जात होता.
पिंपरी बाजारपेठ येथे खास लक्ष्मीपूजनानिमित्त अहमदनगर येथून आज सुमारे पाच हजार किलो झेंडूची आवक झाली. गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे बराच झेंडू भिजला आहे. त्याचा परिणाम त्याच्या विक्रीवरही झाला. भिजलेल्या झेंडूला कमी मागणी होती. तसेच, त्याचा दरही आवाक्यात होता. हा झेंडू आज किरकोळ बाजारात 160 ते 200 रुपये किलो या दराने विकला गेला. त्याऊलट, पावसाने न भिजलेला कलकत्ता आणि साधा झेंडू मात्र 50 ते 100 रुपये किलो या दरात मिळत होता.
लक्ष्मीपूजनानिमित्त आज त्याची जोरदार विक्री झाली. त्याशिवाय, शेवंती, ऍस्टर, गुलछडी, गुलाब, जरबेरा, पिवळी शेवंती, कापडी झेंडू आदींनाही चांगली मागणी होती. पावसाने भिजलेली शेवंतीची फुले 60 ते 100 रुपये किलो दराने तर, सुकी शेवंती 120 ते 160 रुपये किलो दराने उपलब्ध होती.
पिवळी शेवंती – 120 ते 160 रुपये किलो, ऍस्टर – 150 ते 200 रुपये किलो, गुलछडी – 150 ते 200 रुपये किलो, गुलाब – 30 ते 50 रुपये गड्डी (10 फुले), कापडी झेंडु – 60 ते 100 रुपये किलो, जरबेरा – 60 ते 100 रुपये किलो असा आज दर होता. गजरा बंडल 450 ते 500 रुपये आणि अबोली बंडल 150 ते 200 रुपये या दराने मिळत आहे. सुक्या फुलांना आज चांगली मागणी राहिली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही या फुलांना उठाव राहील, असे फुल विक्रेते गणेश आहेर यांनी सांगितले.