मार्केट यार्ड – शिवनेरी पथावर मुख्य रस्त्यालगत मार्केट यार्ड ट्रक टर्मिनल येथील “सुलभ स्वच्छता गृह’ महापालिकेने अडीच वर्षांपासून भाडेतत्त्वावर चालविण्यास दिलेले आहे. परंतु, याचे भाडे महापालिकेला मिळत नसूनही संबंधित स्वच्छतागृहाचा वापर मात्र होत आहे. मागील सहा महिन्यांपासून भोड मिळणेबाबत पाठपुरावा करूनही भाडे मिळत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हे स्वच्छतागृह कोणाच्या कृपा आशीर्वादाने सुरू असून याची भाडेरक्कम नक्की कोणा घेत आहे, याची चौकशी करावी हा “सुलभ गैरकारभार’ उघडकीस आणावा, अशी मागणी कॉंग्रेसचे पुणे शहर व्यापारी सेलचे अध्यक्ष भरत सुराणा यांनी निवेदनाद्वारे आयुक्तांकडे केली आहे.
याबाबत भरत सुराणा म्हणाले की, सर्व सामान्य नागरिकांना मिळकतकर भरण्यास उशीर झाला तर महिना दोन टक्के व्याज दराने दंड आकारणारी पालिकेकडून केली जाते. परंतु, स्वच्छतागृह सारख्या सार्वजनिक मालमत्तेच भाडे मिळत नसताना पालिकेकडून कुठलीही कार्यवाही केली जात नाही. सहा महिन्यांपासून पाठपुरावा करूनही संबंधित अधिकाऱ्यांना दाद दिली जात नाही. की, जाणीव पूर्वक कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे, असा प्रश्न उपस्थित करून याची तातडीने चौकशी करावी, अशी मागणीही कॉंग्रेस पक्षातर्फे केली असल्याचे सुराणा यांनी सांगितले.
मार्केट यार्ड ट्रक टर्मिनल येथील स्वच्छता गृहाच्या भाडेकराराबाबतची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेऊन त्याची माहिती देतो. मी नुकताच पदभार घेतला असून सदर प्रकरणाची फाइल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आहे.
– प्रकाश पवार, सहाय्यक आयुक्त, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय
मार्केट यार्ड ट्रक टर्मिनल येथील स्वच्छता गृहाचे मागील थकलेले भाडे संबंधित एजन्सीकडून वसूल करण्यात यावे व स्वच्छता गृहाबाबत नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यासंदर्भातही कार्यवाही होणे गरजेचे आहे.
– अविनाश सपकाळ, उपायुक्त परिमंडळ पाच पुणे मनपा