नवी दिल्ली – नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग क्षेत्रातील सर्वाधिक 248 प्रकल्पांच्या पुर्ततेत दिरंगाई झाली आहे. त्याचबरोबर रेल्वेचे 116 आणि पेट्रोलियम क्षेत्रात 88 प्रकल्प लांबले आहेत, असे एका सरकारी अहवालात नमूद करण्यात आले. ऑगस्ट 2022 च्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या ताज्या अहवालानुसार, रस्ते वाहतूक आणि महामार्ग क्षेत्रातील 831 प्रकल्पांची माहिती या अहवालाच्या निमीत्ताने घेण्यात आली त्यात 248 प्रकल्पांना मोठी दिरंगाई झाली आहे असे या अहवालात म्हटले आहे.
रेल्वेने जे 173 नवीन प्रकल्प हाती घेतले आहेत त्यातील 116 प्रकल्पांना त्याच्या नियोजनापेक्षा खूप विलंब झाला आहे.
प्रकल्प अंमलबजावणी संस्थांद्वारे ऑनलाइन संगणकीकृत मॉनिटरिंग सिस्टमवर प्रदान केलेल्या माहितीच्या आधारे, पायाभूत सुविधा आणि प्रकल्प देखरेख विभागाला 150 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक किमतीच्या प्रकल्पांचे निरीक्षण करणे बंधनकारक आहे. त्यानुसार त्यांनी जे निरीक्षण केले आहे त्याच्या अहवालात वरील माहिती नमूद करण्यात आली आहे.
मुनीराबाद-महबूबनगर रेल्वे प्रकल्प हा सर्वात विलंबित प्रकल्प असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या प्रकल्पाला 276 महिन्यांचा विलंब झाला आहे.दुसरा सर्वात उशीर झालेला प्रकल्प बेलापूर-सीवूड-अर्बन इलेक्ट्रीफाईड दुहेरी मार्ग आहे, जो 228 महिने विलंबित आहे. तिसरा सर्वात विलंबित प्रकल्प म्हणजे कोटिपल्ली-नरसापूर रेल्वे प्रकल्प असून त्याला 216 महिन्यांचा विलंब झाला आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाच्या 831 प्रकल्पांसाठी मंजुरीच्यावेळी 4 लाख 92 हजार 741 कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित होता. त्या खर्चात प्रकल्पांना झालेल्या विलंबामुळे 9.8 टक्के इतका जादाचा खर्च करावा लागणार आहे. या एकुण प्रकल्पांवर आत्तापर्यंत अपेक्षित खर्चाच्या 59.4 टक्के इतकाच खर्च झाला आहे. तसेच रेल्वे प्रकल्पांच्या विलंबामुळे त्याचा खर्च तब्बल 66 टक्क्यांनी वाढला आहे.