पिंपरी, दि. 7 (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील बहुतेक सर्व पोलीस ठाण्यांमध्ये पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण जाणवत आहे. दुसरीकडे मात्र पोलीस मुख्यालयामध्ये 900 पोलीस कर्मचारी आहेत.
पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलासाठी 4 हजार 840 पदे मंजूर आहेत. त्यातील सध्या 3 हजार 331 पोलीस अधिकारी, कर्मचारी शहर पोलीस दलात कार्यरत आहेत. मंजूर पदांपेक्षा कमी पोलीस उपलब्ध असल्याने जवळपास सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये पोलिसांच्या कामावर ताण येत आहे. पोलीस ठाण्यांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याची ओरड असताना देखील मुख्यालयात मात्र तब्बल 900 पोलीस कर्मचारी उपलब्ध आहेत. हे पोलीस, पोलीस ठाण्यांमध्ये कधी वर्ग होणार, याबाबत सध्या शहर पोलिसात चर्चा सुरू आहे.
पिंपरी-चिंचवड शहरासाठी 15 ऑगस्ट 2018 रोजी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू करण्यात आले. शहर पोलीस दलात चार हजार 282 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदे मंजूर करण्यात आली. पुणे शहर आणि पुणे ग्रामीण मधून पिंपरी चिंचवड शहरासाठी दोन हजार 207 पोलीस अधिकारी, कर्मचारी वर्ग करण्यात आले. उर्वरित दोन हजार 633 पदे नव्याने तीन टप्प्यात भरली जाणार होती. पहिल्या टप्प्यात एक हजार 568, दुसऱ्या टप्प्यात 552 आणि तिसऱ्या टप्प्यात 513 पदे भरली जाणार होती. मात्र चार वर्षात केवळ 720 पोलीस शिपाई पदांची भरती झाली आहे.
सध्या आयुक्तालयात तीन हजार 331 पदे आयुक्तालयात हजर आहेत. तर 977 पदे रिक्त आहेत. आयुक्तालयात चार पोलीस निरीक्षक आणि दोन सहायक निरीक्षक अतिरिक्त आहेत. मंत्रालयीन कर्मचाऱ्यांची देखील 98 पदे मंजूर असून 46 पदे भरली गेली आहेत, तर 52 पदे अजूनही रिक्त आहेत. उपलब्ध असलेल्या तीन हजार 311 पैकी सुमारे 900 कर्मचारी हे मुख्यालयात संलग्न आहेत. शहराच्या विविध भागात मुख्यालयातील पोलीस गटागटाने तैनात केले जातात. निकडीच्या काळात मुख्यालय अथवा पोलीस ठाण्यातील पोलीस घटनास्थळी पोहोचण्यासाठी वेळ लागत असेल अशा वेळी हे मुख्यालयातील पोलीस घटनास्थळी जातात. या राखीव पोलिसांच्या तुकड्या वगळता उर्वरित पोलीस हे पोलीस ठाण्यांना वर्ग करणे आवश्यक असल्याचे पोलिसांमधून बोलले जात आहे.
प्रशिक्षणातील कर्मचारी लवकरच दाखल होणार
शहर पोलीस दलात नुकतीच 720 पोलीस शिपाई पदांची भरती करण्यात आली आहे. हे पोलीस प्रशिक्षणासाठी गेले आहेत. कागदपत्र छाननी, वैद्यकीय चाचणी, न्यायालयीन प्रकरणे अशा अनेक बाबींमुळे एकाच टप्प्यात सर्व उमेदवार प्रशिक्षणासाठी जाऊ शकले नाहीत. मार्च महिन्यात प्रशिक्षणासाठी गेलेली पहिली तुकडी डिसेंबर महिन्यात शहर पोलीस दलात दाखल होईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण संपल्यानंतर पोलीस शिपाई शहर पोलीस दलात दाखल होणार आहेत. त्यानंतर त्यांना काही दिवस मुख्यालयात काम केल्यानंतर पोलीस ठाण्यात वर्ग केले जाणार आहे. असे असले तरी हे मनुष्यबळ प्रत्यक्ष पोलीस ठाण्याच्या कामकाजाला मिळण्यासाठी अजून बराच कालावधी बाकी आहे.