नगर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निघणाऱ्या मिरवणुकीदरम्यान कोणताही गैरप्रकार घडू नये म्हणून काही गुन्हेगारांना दोन दिवसांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. यामध्ये नगर शहरातील भिंगार, तोफखाना व कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील 248 जणांना समावेश आहे. याशिवाय सीआरपीसी 107, 110 नुसार 32 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था धोक्यात येवू नये म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने नगर शहर, भिंगार, नगर तालुक्यातील अरणगाव, श्रीरामपूर शहर, संगमनेर शहर, कर्जत तालुक्यातील मिरजगाव, नेवासा, शेवगाव येथील मिरवणुकीवर पोलिसांची नजर असणार आहे.
अधीक्षक ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ठिकठिकाणी निघणाऱ्या मिरवणुकीची तयारी स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आली आहे. मिरवणुकीसाठी परि. पोलीस अधीक्षक 1, अतिरिक्त पोलीस अधीक्षक 2, पोलीस उपअधीक्षक 6, परि. पोलीस उपअधीक्षक 2, पोलीस निरीक्षक 33, सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक 105, पोलीस अंमलदार 775, एसआरपीएफच्या चार तुकड्या, आरसीबीच्या तीन तुकड्या, क्यूआरटीच्या दोन तुकड्या, ट्रॅकिंग फोर्स 11, पोलिसांच्या मदतीसाठी 600 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.
स्थानिक पोलीस प्रशासनाकडून मिरवणुकीच्या ठिकाणी बॅरेकेटींग, सीसीटीव्ही, आपतकालिन वीजेची व्यवस्था करण्यात आली आहे. काही समाजकंटकांकडून जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, अशा समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.