पुणे -स्थानिक हवामान अंदाज अधिक अचूक आणि वेळेत वर्तविण्याच्या दृष्टीने पुणे शहरासाठी स्वतंत्र डॉप्लर रडार मंजूर केले आहे. त्यासाठी जागा निश्चित करण्याची कार्यवाही सुरू आहे. या रडारमुळे “नाऊकास्ट’ नुसार आगामी दोन ते तीन तासातील अचूक अंदाज वर्तवणे शक्य होणार आहे, अशी माहिती हवामानशास्र विभाग पुणे विभागाचे प्रमख्य के. एस. होसळीकर यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत होसळीकर यांनी ही माहिती दिली. पुणे शहरात सध्या पुणे, पाषाण, लोहगाव, चिंचवड, लवळे, मगरपट्टा या सहा ठिकाणी रिअल टाइम तापमान व हवामान स्थितीविषयक माहिती जमा करण्याची व्यवस्था असून, ही माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असेही होसळीकर यांनी सांगितले. यावेळी डॉ. राजीव चटोपाध्याय यांनी उष्णतेची लाट आणि हवामान प्रारुपांचा आरोग्य क्षेत्रासाठी उपयोग याबाबत माहिती दिली.
पुणे शहर व परिसरासाठी विभागाकडून स्थानिक अंदाज व हवामान सल्ला जाहीर करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने पुणे शहरात 160 ठिकाणी इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डवर हवामानाची माहिती दर्शविण्यात येते आहे. हवामान विभागाकडील हवामान अंदाज, इशारे, त्याचे प्रकार, चिन्हांचे अर्थ आदींबाबतही माहिती दिली जात आहे.
-अनूपम कश्यपी हवामान अंदाज विभाग प्रमुख