मुंबई – अभिनेत्री नुसरत भरुचा गेल्या काही दिवसांपासून ‘छत्रपती’ या चित्रपटासाठी चर्चेत आली आहे. नुकतेच तिने एका मुलाखतीमध्ये बॉलीवूड चित्रपटांविषयी भाष्य केले आहे. तसेच तिने वाईट चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली पाहिजे, असा सल्ला देखील दिला आहे.
एका मुलाखतीदरम्यान नुसरत भरुचा म्हणाली की, “मागील काही महिन्यांमध्ये प्रेक्षकांनी अनेक मोठ्या चित्रपटांकडे पाठ फिरवली आहे. पण प्रेक्षकांच्या या भूमिकेने मी आनंदी झाले आहे. कारण मला वाटते की, जे चित्रपट चांगले नाहीत त्यांच्याकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवलीच पाहिजे. पण जे चित्रपट चांगले आहेत, ते प्रेक्षकांनी पाहिले पाहिजेत. जर प्रेक्षकांनी चांगल्या चित्रपटांना पाठिंबा दिला नाही, तर चांगले चित्रपट तयारच होणार नाहीत. त्यामुळे जे चित्रपट चांगले नाही, ते पाहू नका,” असा सल्ला तिने यावेळी दिला.
पुढे ती म्हणाली, “करोनानंतर प्रेक्षकांना आवडणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये खूप बदल झाला आहे. या काळामध्ये प्रेक्षकांनी अनेवक वेबसिरीज ओटीटीवर पाहिल्या. त्यामुळे कोणत्याही कलाकृतीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलला आहे. आता ते कलाकारांपेक्षा कथेला अधिक महत्त्व देत आहेत. आधी प्रेक्षक 5 हिरोंच्या मागे धावत होते. आता 25 हिरो झाले आहेत, त्यामुळे त्या पाच हिरोंचे महत्त्व कमी झाले आणि हीच सध्याची परिस्थिती आहे.”
दरम्यान, नुसरतने ‘जनहित में जारी’, ‘ड्रीम गर्ल’, ‘सेल्फी’, ‘प्यार का पंचानामा 2’, ‘छोरी’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. या चित्रपटातील अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.