पुणे -देशातील वाढत्या करोनाच्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यात ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येऊ नयेत, अशा स्पष्ट सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशभरातील विद्यापीठे, महाविद्यालयांना दिल्या आहेत.
यूजीसीचे सचिव रजनीश जैन यांनी यासंदर्भातील परिपत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आयआयटीसारख्या केंद्रीय संस्थांना ऑफलाइन पद्धतीने परीक्षा न घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर यूजीसीने देशभरातील विद्यापीठे, महाविद्यालयांना ऑफलाइन परीक्षा न घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तसेच शिक्षण संस्थांच्या आवारात गर्दी होऊ नये. तसेच विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना आवश्यक ती मदत करण्यात यावी, असेही यूजीसीने स्पष्ट केले आहे. त्याप्रमाणे परिस्थितीचा आढावा घेऊन ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेता येतील, असेही यूजीसीने म्हटले आहे.
ऑनलाइन परीक्षेची आवश्यक तयारी आहे का याची खात्री करून घ्यावी. परीक्षेसंबंधित सर्व घटकांच्या आरोग्याचा, सुरक्षिततेचा विचार करून करोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन, केंद्रीय शिक्षण मंत्रालय, यूजीच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असेही परिपत्रकात नमूद आहे.