सातारा – साताऱ्यात भाजपचे खासदार ‘उदयनराजे भोसलेंचा’ अंदाज नेहमी हटके असतो. ते कधी काय करतील याचा कोणालाच अंदाज लागत नाही. राजकीय परिणामांची भीती न बाळगता त्यांनी केलेल्या अनेक वक्तव्यांमुळे यापूर्वी राज्यात धुरळा उडवून दिला होता. मजबूत शरीरयष्टी, भेदक नजर, तडकाफडकी जागेवर निकाल लावण्याच्या त्यांच्या वृत्तीचा साताऱ्यातच नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रात बोलबाला असतो.
युवकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या उदयनराजेंनी उगारलेलं बोट, उडविलेली कॉलर, काय बाई सांगू कसं गं सांगू…. हे म्हणलेलं गाणं, त्यांची 007 क्रमांकाच्या जिप्सीचं नेहमी सर्वांना आकर्षण असतं. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा साताऱ्यात पाहायला मिळाला आहे. नुकतंच साताऱ्यातील गांधी मैदानावर छत्रपती उदयनराजे भोसले यांचा 57 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर या म्युझिकल कपलच्या ‘जल्लोष गाण्यांचा’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
खासदार उदयनराजे भोसले यांनी सादर केलेल्या गाण्यामुळे चाहत्यांनी जल्लोष केला @Chh_Udayanraje pic.twitter.com/nrPfd9646B
— Anish Bendre (@BendreAnish) February 24, 2023
यावेळी रोहित राऊतच्या आग्रहानंतर उदयनराजेंचा गाता गळा अनुभवण्याची संधी सातारकरांना मिळाली. चाहते आणि समर्थकांचा आग्रह उदयनराजे फारसे मोडताना दिसत नाहीत. यावेळी गाणं गाण्याबाबत चाहत्यांनी केलेला हट्टही उदयनराजेंनी पुरवला असल्याचं पाहायला मिळालं. रोहित राऊतने उदयनराजेंच्या जवळ येऊन दोन शब्द गाण्याचा आग्रह यावेळी धरला असता त्यांनी “तेरे बिना… जिया जाये ना” हे गाणं गायलं. त्यांच्या या गाण्यानंतर सगळीकडे एकच जल्लोष पाहायला मिळाला. सध्या उदयनराजेंचा हा गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील चांगलाच व्हायरल होत आहे.