लंडन – हॉंगकॉंगबाबत कोणताही हस्तक्षेप करण्याच्या परिणामांबाबत चीनने ब्रिटनला इशारा दिला आहे. ब्रिटनने हॉंगकॉंग प्रत्यार्पण स्थगित केल्यानंतर चीनने प्रथमच हा स्पष्ट इशारा दिला आहे. ब्रिटीश वसाहत असलेल्या हॉंगकॉंगला चीनकडे सुपूर्त करण्यापूर्वी काही गृहितके निश्चित करण्यात आली होती.
पूर्वीच्या ब्रिटीश वसाहतीतील हॉंगकॉंगच्या व्यवस्थेसंदर्भातील महत्त्वाच्या गृहितकांमध्ये चीनच्या नवीन राष्ट्रीय सुरक्षा कायद्याने लक्षणीय बदल केले आहेत. त्यामुळे हॉंगकॉंगला चीनकडे हस्तांतरित करण्याचा करार बेमुदत स्थगित केला जात आहे, असे ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डॉमिनिक राब यांनी सोमवारी हाऊस ऑफ कॉमन्सला सांगितले होते.
चीनचे वर्तन युनायटेड किंगडम आणि सर्व जगही बघते आहे, अशा शब्दात राब यांनी चीनला इशारा दिला होता. मात्र त्यांच्या या निवेदनानंतर चीनच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप केल्याची टीका चीनने केली. लंडनमधील चीनच्या दूतावासाने आणि ब्रिटनमधील चीनच्या राजादूतांनीही ब्रिटनच्या निर्णयावर कठोर टीका केली आहे.
ब्रिटनकडून चीनच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेपच केला जात आहे. एवढेच नाही, तर आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विसंगत कृती केली जात आहे आणि आंतरराष्ट्रीय संबंधांबाबतचे सर्वसाधारण निकषही ब्रिटनकडून पाळले जात नाही आहेत, असे लिऊ झियामिंग यांनी ट्विटरच्या निवेदनात म्हटले आहे.
चीनने ब्रिटनच्या अंतर्गत कारभारात कधीही हस्तक्षेप केलेला नाही. ब्रिटननेही चीनबाबत असेच केले पाहिजे. अन्यथा त्याचे परिणाम भोगायलाच हवेत. असे ते म्हणाले. चीनच्या दूतावासानेही ब्रिटनला इशारा देणारे विस्तृत निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.
हॉंगकॉंगमधील राष्ट्रीय सुरक्षा कायदा हा सार्वभौमत्व, विकास, सुरक्षेसाठीच लागू करण्यात आला असून हा कायदा न लागू करण्याची कोणतीही शक्यता चीनने पूर्वीही फेटाळली आहे.