पुणे – विशेष समित्यांसह, महापालिकेच्या कार्यक्रमांचे, प्रस्तावांच्या नियोजनाची जबाबदारी असलेल्या नगरसचिव विभागाला तीन वर्षांपासून नगरसचिव आणि उपनगरसचिव मिळालेला नाही.
तत्कालीन नगरसचिव सुनील पारखी सेवानिवृत्त झाल्यापासून हे पद रिक्त आहे. याचा अतिरिक्त पदभार कामगार कल्याण अधिकारी शिवाजी दौंडकर यांच्याकडे असून तेदेखील मे अखेरीस सेवानिवृत्त होत आहेत. तरीही या जागेवर उमेदवार निवडीकडे दुर्लक्ष केले जात आहे. हे पद भरण्यासाठी पालिकेने प्रक्रियाही राबविली होती. मात्र, आलेले उमेदवार या सक्षम नसल्याचे सांगत प्रशासनाने हे पदच भरलेले नाही.
या पद भरतीसाठी जाहिरातीनंतर 42 उमेदवारांनी अर्ज केले होते. 29 जणांच्या मुलाखती झाल्या. यात उमेदवारांना मुख्य सभा किती दिवसांनी बोलवायची? महापौरांचे अधिकार काय? स्थायी समितीचे किती सदस्य खास सभा बोलवू शकतात? असे प्रश्न विचारण्यात आले. मात्र, उमेदवारांना त्याची उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे प्रशासनाने कोणाचीही निवड केली नाही.
या कारणासाठी महत्वाचे पद
महानगरपालिकेच्या कामकाजात नगरसचिव हे महत्त्वाचे आणि संविधानिक पद आहे. प्रशासन तसेच महापौरांसह राजकीय पदाधिकाऱ्यांच्या समन्वयाची जबाबदारी नगरसचिवावर असते. मुख्यसभा, स्थायी समितीचे नियोजन ते त्याचे कार्यपत्रक प्रकाशित करण्यापर्यंत, सभेचे संघटन, त्याच्याशी संबंधित निवडणूक प्रक्रिया, विशेष विषय समित्यांची प्रक्रिया आणि त्याच्या निवडणुकीची प्रक्रिया देखील नगरसचिव करतात. महापौर कार्यालयाचे सर्व काम देखील नगरसचिव करतात.